सरकार आहोत, सावकार नाही! - डॉ. नितीन राऊत

जनदूत टिम    23-Jun-2020
Total Views |
मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसात ऑनलाईन आलेल्या वीजबिलांचे लठ्ठ आकडे ऐकून ग्राहकांना धक्का बसला आहे आणि महावितरणच्या विविध कार्यालयांवर ते गर्दी करत आहेत अशा बातम्या माझ्या कानावर आल्या.
 
DevNit_1  H x W
 
वास्तविक काही मूलभूत आणि ढोबळ गोष्टी समजून घेण्याची, विशेषतः मध्यमवर्गाने, आवश्यकता आहे. वीजबिलांचे आकडे हे सरकारने हेतूपुरस्सर फुगवलेले नसून त्यात कुठलीही बनवाबनवी नाही हे आधी लक्षात घ्या, मग आपोआप दोषारोप करणे थांबेल. गेले तीन महिने तुम्हाला वीज बिले आली नव्हती. लॉकडाऊनमुळे महावितरणचे लोक मुळात अनेक ठिकाणी मीटर रीडिंग घ्यायला जाऊच शकले नाहीत किंवा कोविड नियम म्हणून गेले नाहीत. तद्वत, आजची ही बिले मागील तीन महिन्यांची सरासरी बिले आहेत. १२ मार्च ते १२ एप्रिल, १३ एप्रिल ते १३ मे, आणि १४ मे ते १४ जून असा या बिलांचा ढोबळ कालावधी आहे.
 
★ काही ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष रीडिंग घेतले असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे. सरकारने केलेले लॉकडाऊनचे नियम, सरकारनेच तोडायचे, ते सुद्धा आधीच आर्थिक आघाडीवर त्रस्त असलेल्या जनतेकडून पैसे वसूल करण्यासाठी, हे सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभून दिसले नसते. १ एप्रिल पासून वीज नियामक आयोगाने वीज दरात वाढ केली आहे, सरकारने नाही. ते वाढीव दर या बिलांमध्ये समाविष्ट आहेत.
 
★ जेव्हा तुम्ही रोजच्या कामाला जाता, मुलेबाळे शाळा कॉलेजमध्ये जातात, तेव्हा घरात विजेचा वापर कमी असतो. तथापि, जेव्हा तुम्ही सारेजण घरीच आहात, पंखे, दिवे, एसी, टीव्ही, अहोरात्र चालू आहेत, तेव्हा अर्थातच विजेचा वापर प्रचंड वाढतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत कुणी बिल भरले किंवा नाही, आम्ही कुणाचीही वीज कापली नाही. सरकार स्वतः आर्थिक अडचणीत असूनसुद्धा. सबब, मी निःसंदिग्धपणे सांगतो की, लोकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक वीज वितरण कंपनीने केलेली नाही आणि करणार देखील नाही. आपण आमचे पिढ्यानपिढ्या ग्राहक आहात. कुठलाही सूज्ञ व्यापारी आपल्या जुन्या ग्राहकाला फसवण्याचा मूर्खपणा करत नाही आणि आम्ही मूर्ख नाही.
 
काही ठिकाणी चुका घडल्याही असतील, पण ते प्रमाण अल्प आहे आणि त्यात सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. शिवाय आमचे अभियंते, अधिकारी तुम्हाला सहाय्य करायला तत्पर आहेत. कालच नव्या मुंबईत आमचे एक तरुण कार्यकारी अभियंते शेखर मुरकुटे यांनी एका पंचतारांकित सोसायटीच्या काही चिडलेल्या रहिवाशांना, स्वतःचा तोल ढळू न देता, मुद्देसूद उत्तरे, आकडेवारी आणि तपशीलवार हिशेब देऊन शांत केल्याचे माझ्या कानावर आले. (किंबहुना, असे धीरोदात्त अधिकारी माझ्याकडे आहेत म्हणूनच परवाच्या निसर्ग चक्रीवादळाला आणि विजेचे दिवे बंद करून पणत्या लावण्याच्या चक्रमपणाला आम्ही समर्थपणे तोंड देऊ शकलो). पण याचा अर्थ असा नाही की आम्ही हटवादी आहोत. *जिथे आमची चूक असेल तिथे ती आम्ही नक्की दुरुस्त करू. दरम्यान, एक आनंदाची गोष्ट लक्षात ठेवा. कालपरवा आलेली ही बिले एकरकमी भरण्याची तुमच्यावर सक्ती नाही. स्थानिक अभियंत्याशी चर्चा करून ती सुलभ हप्त्यात भरा. आम्ही तुमची मनगटे पिरगळणार नाही. आम्ही एक लोकाभिमुख सरकार आहोत, सावकार नाही!