बिगर आयकर दात्यांच्या कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख द्या – माकप आमदार विनोद निकोले

17 Jun 2020 23:54:47
डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली केंद्राच्या अनियोजित लॉकडाऊन मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या निषेधार्थ अखिल भारतीय निषेध दिन सर्वत्र पाळण्यात आला. दरम्यान बिगर आयकर दात्यांच्या कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख मदत द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली.

CpiM - Dahanu_1 &nbs 
यावेळी आ. निकोले म्हणाले की, दि. ०२ जून २०२० रोजी माकप पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या ऑनलाइन बैठकीने प्रसृत केलेल्या सविस्तर निवेदनात दिल्याप्रमाणे पक्षाने १६ जून रोजी देशव्यापी निषेध दिनाची हाक दिली त्या अनुषंगाने हा दिन पाळण्यात आला. देशात आधीच बेरोजगारीने विक्राळ रूप धारण केले होते; त्यात लॉकडाऊने १५ कोटी कामगारांना बेरोजगार केले आहे. देशातला मोठा जनविभाग उपजीविकेच्या साधनांपासून पूर्णतः वंचित झाला आहे.
 
आपल्या घरांकडे पायी चालत जात असलेल्या मजुरांची काळीज फाडणारी उपासमार पाहून जनतेची काय अन्नान्नदशा झाली आहे, हे दिसत आहे. जनतेवर अशी दारूण परिस्थिती लादणाऱ्या सरकारचा देशभर सर्वत्र निषेध केलाच पाहिजे, असा निर्णय पॉलिटब्यूरोने घेतला होता. आपापल्या परिसरात लागू करण्यात आलेले नियम काटेकोरपणे पाळूनच आणि शारीरिक अंतर राखत, मास्कचा वापर करत रस्त्यावर येऊन निषेध आम्ही केला असून १) इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत. २) सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे. ३) मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे.
 
शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा. ४) राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या, अशा प्रमुख मागण्यांवर हा निषेध दिन पाळण्यात आला व ही हाक भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पॉलिटब्यूरो तर्फे देण्यात आली होती.
 
यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) केंद्रीय समिती सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार कॉम्रेड विनोद निकोले, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत घोरखाना, डहाणू शहर सचिव कॉ. धनेश अक्रे, कॉ. रशीद पेंटर, कॉ. महेंद्र दवणे, कॉ. लता घोरखाना, सर्व युनिट सेक्रेटरी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0