बाळासाहेब थोरात करणार रायगड जिल्ह्याची पाहणी

14 Jun 2020 19:40:29

- माणिक जगताप यांनी कथन केली रायगड जिल्ह्याची झालेली वाताहात

 महाड: चक्रीवादळानंतर रायगड जिल्ह्याची झालेली वाताहात महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. महसूल मंत्री या नात्याने या नुकसानीची पाहणी करुन वादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आपण रायगडचा दौरा करावा अशी विनंती जगताप यांनी त्यांना केल्यानंतर त्यांनी हा दौरा करण्याचे मान्य केल्याचे जगताप यांनी सांगितले.

Balasaheb Thorat_1 &
 
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. माणिक जगताप यांनी श्रीवर्धन आणि म्हसळा या दोन तालुक्यांचा दौरा करुन त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती गोळा केली. आणि गुरुवारी बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून त्यांना या नुकसानीचा आढावा दिला. शासनाने आपदग्रस्तांना मदत जाहीर केली असली तरी ती पुरेशी नसून तीमध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे आणि ही मदत तत्काळ मिळणे गरजेचे असल्याचे जगताप यांनी त्यांना सांगितले. त्यावर या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही ना. थोरात यांनी दिली आहे.
 
त्याचवेळेस रायगड जिल्ह्याचा दौरा करून आपणही रायगडातील परिस्थितीचा आढावा घेण्याची विनंती देखील जगताप यांनी ना. थोरात यांना केली. ती विनंती देखील ना. थोरात यांनी मान्य केली असल्याचे जगताप यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0