नळदुर्ग शहरात 3 दिवस जनता कर्फ्यु - आ.राणाजगजितसिंह पाटील

जनदूत टिम    01-Jun-2020
Total Views |

- कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

उस्मानाबाद : नळदुर्ग शहरात कोविड-१९ विषाणू संक्रमित रुग्ण सापडल्याने आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथे भेट देवून नगरसेवक, महसूल, आरोग्य, न.प. व पोलिस अधिकार्‍यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नळदुर्ग शहरात नागरिकांनी केलेली गर्दी पाहून पुढील प्रसार रोखण्यासाठी तीन दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करत संबंधित अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश दिले.
 
Ranada_1  H x W
 
नळदुर्ग येथे सापडलेला रुग्ण हा अनधिकृत पान टपरी चालवत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक त्याच्या संपर्कात आलेले आहेत.तसेच संबंधित रुग्ण चार ते पाच दिवस उस्मानाबाद शहरात वास्तव्याला होता व त्याने कांही खाजगी डॉक्टर्स कडे तपासणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती तातडीने मिळवून सर्व संबंधितांना क्वांरंटाईन करावे अशा सूचना आ.पाटील यांनी संबंधितांना दिल्या. हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले असून सर्वांच्या स्वब (swab)तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णाच्या संपर्कातील इतरांची माहिती घेण्यात येत असून त्यांना देखील तातडीने कॉरनटाईन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
 
रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र केला असून परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या कडून प्रतिबंधित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून न. प. प्रभारी मुख्याधिकार हेमंत केरूळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात अलल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांसाठी आर्सेनिकम अल्बम 30 या रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे देखील वाटप करण्यात आले.
रुग्णाच्या वाढत्या संपर्कामुळे केवळ प्रतिबंधित क्षेत्रच सिल न करता, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील प्रसार रोखण्यासाठी तीन दिवस संपूर्ण नळदुर्ग शहरा मध्ये जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
शहरात रुग्ण सापडला म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या कुटुंबात अथवा जवळपासच्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास अथवा थोडा जरी संशय वाटत असेल तरी तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात जावून आवश्यक तपासणी करून घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.
 
यावेळी त्यांचे सोबत जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के, प्रभारी मुख्याधिकार हेमंत केरूळकर, लक्ष्मण कुंभार, पिंटू मुळे, नगरसेवक अप्पा धरणे, नय्यर जहागीरदार, सुशांत भूमकर, सुनील बनसोडे, संजय जाधव, श्रमिक पोतदार, विशाल डुकरे आदी उपस्थित होते.