श्रमिक ट्रेन चालवण्यात रेल्वे मंत्रालयाची मनमानी, ममतांचा आरोप

जनदूत टिम    28-May-2020
Total Views |
कोलकाताः श्रमिक विशेष ट्रेनवरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्राला टीकेचं लक्ष्य केलं आहे. श्रमिक विशेष ट्रेनवरून ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रालयावर निशाणा साधला आहे. स्थलांतरीत मजुरांसाठीच्या विशेष ट्रेन रेल्वे मंत्रालय आपल्या मर्जीने आणि अटींवर चालवत आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केलाय.
 
Mamata_1  H x W
 
पश्चिम बंगालला अम्फान महाचक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेकडून रोज श्रमिक ट्रेन पाठवल्या जात आहेत. यामुळे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. रेल्वे मंत्रालय असं का करतंय? हे आपल्याला कळत नाहीए. दोन लाख स्थलांतरीत मजुरांची तपासणी आम्ही कशी करणार? केंद्र सरकार आम्हाला मदत करेल का? असा सवाल ममता बॅनर्जींनी केला. महाराष्ट्र रिकामा करून तुम्ही पश्चिम बंगालमध्ये करोनाचा प्रादुर्भाव करत आहात. स्थलांतरीत मजुरांच्या ११ ट्रेन पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरा दाखल होत आहेत. आणखी १७ ट्रेन येणार आहेत.
 
भाजपने राजकारण करून आपल्याला त्रास दिल्यास काही हरकत नाही. पण ते राज्याचं नुकसान करत आहेत. रेल्वे मंत्रालयाचा अतिशय बेजबाबदार कारभार आहे, असा आरोप ममतांनी केलाय. करोनाच्या या संकटाच्या काळात राजकारण करण्याची ही वेळ नाहीए. करोनाचे संकट देशातून संपायला हवे. फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशातील विविध भागांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. बिहारमध्ये भाजप-जेडीयूसोबत सत्तेत आहे.