कामाच्या ठिकाणीच मजुरी देण्याची व्यवस्था करा - विवेक पंडित

प्रमोद पवार    28-May-2020
Total Views |
मोखाडा: लॉकडाऊन मुळे रोजंदारी कामगार, मजूर वर्गावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली,अशा परिस्थिती मध्ये घरपोच धान्य मदत म्हणून वाटप करून स्वस्थ न बसता श्रमजीवी संघटनेने शासनाला रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामं काढायला लावली, मागणी अर्ज केले, कामंही सुरू झाली, मात्र या कामांची मजुरी बँकेत येते, ही मजुरी काढायची असेल तर मजूरांना आपल्या घरातुन पहाटे पाच वाजता बँकेच्या दिशेने रवाना होऊन रांगेत नंबर लावावा लागतो. "नंबर लागला त आज, नाहीतर परत उद्या" अशी व्यथा मोखाड्यातीळ कोशिमशेत बेडूक पाडा येथील रोजगार हमी मजूर सोमा काळू गांगड यांनी स्वतः श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या पाहणी दौऱ्यात त्यांच्याजवळ मांडली. रोजची मजुरी 238 रुपये म्हणजे 2 दिवसाचे 476 रुपये त्यात वाहनाने गेले तर 100 रुपये प्रवास खर्च, दोन फेऱ्या झाल्या तर 200 प्रवासातच गेले तर शिल्लक काय उरेल हा प्रश्न आहे.
 
Vivek Pandit_1  
 
संघटनेच्या प्रयत्नांनी आणि प्रत्यक्ष गाव पाड्यात जाऊन केलेल्या कामाची फलश्रुती म्हणून पालघर जिल्ह्यात या आठ दिवसात 19 हजार 270 मजुरांनी रोजगार हमी च्या कामाची लेखी मागणी केलेली आहे. त्यात 9 हजार पेक्षा जास्त मजूर आता मोखाडा तालुक्यात कार्यरत आहेत. या मजूरांना काम तर मिळाले पण मजुरी वेळेत मिळाली नाही तर पुनः उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहेच. या मजुरांचे पोट तळहातावर आहे, दिवसभर राबायचे तर संध्याकाळी चूल पेटेल अशी अवस्था असताना जर असे बँकेचे काम असेल तर मजुरांच्या उपासमारीची उपयोजना कशी होणार असा सवाल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा अनुसूचित क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी विचारला आहे.
 
याबाबत विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधून याबाबत चर्चा केली, बँक कोड जनरेट करून प्रतिनिधी नेमून मजूरांना जागेवरच मजुरी अदा करता येऊन शकेल हे सांगितले, विक्रमगड तालुक्यातील श्रमजीवी चे कार्यकर्ते तुषार सांबरे, पौर्णिमा पवार, ज्योती दिघा यांनी असा बँक कोड काढून मजूरांना जागेवर पैसे देण्याची सोय
केली आहे. याबाबत बैठकीत अग्रणी बँकेला सूचना वजा आदेश देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्याची खंत जिल्हाधिकारी शिंदे यांनी व्यक्त केली. शासनाकडे यापूर्वी जव्हार मोखाडा या दुर्गम भागातील कोनेक्टिव्हिटी सक्षम करावी अशी मागणी पंडित यांनी यापूर्वीही अनेकदा केली आहे. तालुक्यात्या रोहयोला चे काम मधल्या काळात कमी होण्यालाही कनेक्टिव्हिटी आणि बँक प्रक्रिया जबाबदार आहे.
 
मात्र सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शासनाची मानसिकता आणि इच्छा शक्तीचा अभाव आहे असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त करत, रोजगार हमी च्या कामाबाबत विशेष धोरण अवलंबत शासनाने कामाच्या ठिकाणी मजुरीचे पेमेंट कामाच्या जागेवर करण्याबाबत कठोर निर्णय घ्यावा ,विक्रमगड मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे, तो सर्वत्र राबवून बॅंकेच्या रांगेपासून, सर्व्हर डाऊन, नेटवर्क स्लो या गोष्टीपासून मजुरांची सुटका करावी असे आवाहन सरकारला पंडित यांनी केले. संघटनेचे इच्छुक तरुण असतील तर त्यांनी बँकेकडे तसे प्रतिनिधी म्हणून अर्ज करावे, बँक जिल्हाधिकारी यांचेही ऐकत नसेल तर संघटनेने बँकेविरोधातही आंदोलनाची तयारी ठेवावी असेही पंडित म्हणाले.