कोरोनासारखे महासंकट आणि साधना

चेतन राजहंस    27-May-2020
Total Views |
आजमितीला कोरोनारूपी संकटाने साऱ्या विश्वाला ग्रासले आहे. या महामारीचा प्रतिदिन होत असलेला फैलाव आणि मृत्यूचे वाढत जाणारे आकडे यांमुळे सर्वत्र भयाचे वातावरण आहे.
 
Chetan_Rajhans_clr_1 
 
कोरोना नैसर्गिक रोग आहे की मानवनिर्मित आपत्ती आहे, हे फारसे स्पष्ट समजलेले नाही. काही देशांत वैज्ञानिक आदी तज्ञ मंडळी याला मानवनिर्मित आपत्तीच समजत आहेत. मानवाच्या साहाय्याला उपयुक्त असलेल्या विज्ञानाच्या आधारावर मानवसमूहलाच हे नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याचे कारण म्हणजे, ‘मानवाची तमोगुणी प्रवृत्ती’ होय. एखादी आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आपल्याला त्या आपत्तीमागील दृष्टीकोन कोणता आहे आणि त्या संदर्भात शारीरिक, मानसिक, तसेच आध्यात्मिक स्तरावर कोणती सिद्धता करू शकतो, हे आपण या लेखातून जाणून घेत आहोत.
 
आध्यात्मिक दृष्टीकोनातून वैश्विक संकटे का येतात, आपत्काळ रोखणे शक्य आहे का, तसेच आपत्काळाची सिद्धता विविध स्तरांवर कशी केली पाहिजे, याविषयीचा ऊहापोह लेखाच्या उत्तरार्धात केलेला आहे.
(वाचकांना सूचना : प्रस्तुत लेखात कोरोना महामारी आणि तत्सम आपत्कालीन परिस्थितीचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केलेला आहे. कोरोना व्हायरस (COVID 19) विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे वाचकांनी पालन करावे. या लेखात दिलेल्या आध्यात्मिक उपचार पद्धतींचा ही वाचकांकडून विचार व्हावा.)
 
३. आध्यात्मिक दृष्टीकोनातून वैश्विक संकटे का येतात?
३ अ. आध्यात्मिक दृष्टीकोनाचे वैशिष्ट्य ! : सृष्टीचे संचालन कोणत्याही देशाचे सरकार किंवा आर्थिक महासत्ता यांच्याद्वारे होत नाही. सृष्टीचे संचालन परमात्मा करतो. या संचालनाचे विज्ञान जर आम्ही समजून घेतले नाही, तर वैश्विक आपत्ती आणि त्यावरील योग्य उपाययोजना कसे समजू शकणार? आपण सौभाग्यशाली आहोत की, आपल्या प्राचीन हिंदु धर्मग्रंथांमध्ये सृष्टी आणि तिचे संचालन या विषयाचे स्थूल अध्ययनासह सूक्ष्मतेने आणि स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. ‘कौशिकपद्धति’ या ग्रंथामध्ये आपत्काळाच्या कारणांचे वर्णन आहे.
 
३ आ. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा कालचक्राचा नियम : उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजेच युगपरिवर्तन हा ईश्वरनिर्मित सृष्टीचा एक नियम आहे. जी वस्तू उत्पन्न होते, ती काही काळापर्यंतच टिकते आणि शेवटी ती नष्ट होते. या नियमानुसार आताचा काळ कालचक्रातील एक परिवर्तनाचा काळ आहे. दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाले, तर आपत्तींमुळे सृष्टी तिचे संतुलन राखत आहे. याचा एक मार्ग म्हणजे नैसर्गिक आपत्ती. यात सृष्टी कार्य कशी करते, ते पाहूया ! ज्या प्रकारे धूळ आणि धूर यांमुळे स्थूल स्तरावर प्रदूषण होते, त्याच प्रकारे समाजात सर्वत्र पसरलेल्या अधर्म आणि साधनेचा अभाव यांमुळे मानवामध्ये, तसेच वातावरणातही रज-तम वाढले आहे. ज्या प्रकारे आम्ही ज्या घरात रहातो, तेथील धूळ-कचरा (घाण) वेळोवेळी स्थूलरूपाने काढतो, त्याच प्रकारे सृष्टी म्हणजे प्रकृतीही रज-तमाचे प्रदूषण दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी पंचमहाभूतांच्या माध्यमांतून कार्यरत होते. या पंचमहाभूतांच्या माध्यमातून भूकंप, पूर, ज्वालामुखी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होते. पंचमहाभूतांपैकी पृथ्वीतत्त्व प्रभावित झाले की त्याची परिणती भूकंपात होते. आपतत्त्व प्रभावित झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ (पूर येणे किंवा अतिरिक्त हिमवर्षा होणे इत्यादी) होते.
 
३ इ. मनुष्याचे कर्म आणि समष्टी प्रारब्ध ! : वर्तमान कलियुगात मनुष्याचे ६५ टक्के जीवन प्रारब्धानुसार आणि ३५ टक्के क्रियमाण कर्मानुसार असते. ३५ टक्के क्रियमाणाद्वारे झालेल्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ प्रारब्धाच्या रूपात मनुष्याला भोगावे लागते. वर्तमानकाळात धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांच्या अभावापायी समाजातील अनेक लोकांचा स्वार्थ किंवा तमोगुण वाढला आहे. त्यांच्या चुकीच्या कर्मांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची हानी होत आहे. ही चुकीची कर्मे संपूर्ण समाजाला भोगावी लागत आहेत. यामागील कारण असे की, संपूर्ण समाजच त्या कर्मांकडे दुर्लक्ष करत आहे. अशा प्रकारे समष्टीच्या वाईट कर्मांची फळेसुद्धा त्याला नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने सहन करावी लागत आहेत. जसे ‘आगीत सुक्यासमवेत ओलेही जळते ’ त्याच प्रकारे हे आहे. याच प्रकारे समाज, राष्ट्र आणि धर्म यांचेसुद्धा समष्टी प्रारब्ध मानले जाते. समाजात आध्यात्मिक अपवित्रता वाढल्यामुळे वर्ष २०१३ पासून ते वर्ष २०२३ या कालखंडात मनुष्यजातीला कठीण समष्टी प्रारब्ध भोगावे लागेल
 
४. आपत्काळ रोखणे शक्य आहे का ?
‘आपली संस्कृती ही निसर्गाची (प्रकृतीची) पूजा करणारी होती. गोमाता, गंगानदी, वड, पिंपळ, गंगासागर, कैलास पर्वत, मानसरोवर अशा प्रकारे वृक्षांपासून महासागरापर्यंत निसर्गाची पूजा केली जात होती. आमची संस्कृती या भूमीला पवित्र भारतमाता मानणारी, दगडामध्येही भगवंत पाहून त्याचे पूजन करणारी होती; परंतु विदेशी शिक्षणपद्धत आणि कम्युनिस्ट विचारधारा यांच्यामुळे आपण तिला खालच्या दर्ज्याचे मानण्यास आरंभ केला. गोमातेला सांभाळण्यात आम्हाला लाभ-हानी दिसू लागली. हळू हळू आम्ही पश्‍चिमेकडे आकर्षित होऊन आपले ऋषि-मुनी आणि पूर्वज यांनी सांभाळलेल्या आचरण पद्धतीला नाकारले. ‘विदेशात जे होत आहे, ते चांगले आणि आमचे वयस्कर व्यक्ती जे धर्माचे ज्ञान देतात, ते मागासलेले’, अशी मानसिकता स्वीकारल्यामुळे आपली मोठी हानी झाली आहे.
आमच्या मनोभावात केवळ परिवर्तन झाले नाही, तर ते ढासळत गेले आहे.
 
तुळशीचे स्थान ‘मनीप्लांट’ने घेतले.
गोमातेचे स्थान कुत्र्यांनी घेतले.
 
आम्ही हात जोडून नमस्कार, राम-राम म्हणणे सोडून हस्तांदोलन (शेकहँड) करायला आरंभ केले.
वाढदिवसाच्या दिवशी आरती (औक्षण) करणे सोडून, केक कापणे आणि फुंकर मारून मेणबत्ती विझवणे आरंभ केले.
बाहेरून घरात येतांना पाय धुणे, तर दूरची गोष्ट झाली. पादत्राणे घालूनच आम्ही संपूर्ण घरात फिरू लागलो. काय खायचे, केव्हा खायचे, कसे खायचे, याचेही भान ठेवणे आम्ही सोडून दिले. उष्टे किंवा प्राण्याद्वारे हुंगलेले भोजन न खाणे, जन्म-मृत्यूच्या वेळी साेयर-सुतक पाळणे इत्यादी सर्व आमच्या आचारधर्माच्या गोष्टी आम्ही मागासलेपणाच्या नावावर नाकारल्या आहेत.
मंदिरात जाण्यात आम्हाला लाज वाटते.
 
खेद याचा आहे की, अज्ञानामुळे ज्या गोष्टी आम्ही सोडल्या आहेत, त्या गोष्टी आज विदेशात आत्मसात केल्या जात आहेत.
‘स्वाइन फ्ल्यू’ आणि आता ‘कोरोना’ नंतर संपूर्ण विश्व ‘नमस्कार’ करत आहे. ‘डिस्कव्हरी चॅनेल’ हा शोध सांगत आहेत की, जेव्हा लहान मुलांच्या वाढदिवसानिमित्त केकवर ठेवलेली मेणबत्ती विझवली जाते, तेव्हा त्या मुलाच्या मुखातील जिवाणु जाऊन केकवर पडतात, असा केक खाणे प्रकृतीसाठी अयोग्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता बाहेरून आल्यावर लोक स्नान करू लागले आहेत, पुन: पुन्हा हातपाय धूत आहेत; परंतु आमच्याकडे ‘संध्या’ होत होती हे आम्ही का विसरलो ? आमच्याकडे बाहेरून आल्यावर पादत्राणे काढून हातपाय धुऊनच घरात प्रवेश करत होतो. घरात असलो, तरीही संध्याकाळी हातपाय, तोंड धुणे एक नित्य आचरण होते.
 
आमच्या धर्माचरणाला स्वच्छतेपर्यंतच सीमित ठेवले नव्हते, तर स्वच्छतेसह पावित्र्य कसे राखले जाईल, एवढ्या खोलवर आमचे चिंंतन होते. परंतु आम्ही सर्व सोडले आणि आता त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला आपल्या महान भारतीय संस्कृती व धर्म यांच्याकडे परतावेच लागेल.
 
आपत्काळाची सिद्धता कशी केली पाहिजे ?
१. आपत्काळाच्या दृष्टीने भौतिक सिद्धता : आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. पेट्रोल, डिझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक-व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक महिने मिळत नाहीत वा मिळाल्या, तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणे जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. पुढे दिलेल्या सूत्रांचे सरकारी निर्देश लक्षात घेऊन तारतम्याने पालन करावे !
 
१अ. शारीरिक स्तर
१. अन्नावाचून उपासमार न होण्यासाठी पुढील काही मास किंवा वर्षे पुरेल एवढे अन्नधान्य साठवून ठेवावे ! स्वयंपाक करतांना यंत्रांचा (उदा. मिक्सरचा) वापर करणे अल्प करून पारंपरिक वस्तूंचा, उदा. पाटा-वरवंटा यांचा वापर करण्याची सवय आतापासूनच लावावी. अन्नधान्याची लागवड, कंदमुळांची लागवड, गोपालन आदी करण्याचा विचार करावा !
२. पाण्यावाचून हाल न होण्यासाठी घराजवळ विहीर नसल्यास ती खणून घ्यावी. पाणी साठवण्यासाठी मोठ्या टाक्यांची सोय करावी.
 
३. डॉक्टर, वैद्य, रुग्णालये आदींची होणारी अनुपलब्धता लक्षात घेऊन आरोग्य चांगले रहाण्यासाठी लहानसहान विकारांच्या उपचारांसाठी औषधांवर अवलंबून न रहाता उपवास करणे, अंगावर ऊन घेणे आदी विना-औषध उपचारांचा वापर आतापासूनच आरंभ करावा. तसेच औषधी वनस्पतींची लागवड करावी. विकार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा तो होऊच नये, तसेच प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम रहाण्यासाठी आतापासूनच नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने करणे, भूक लागल्यावरच खाणे, अनावश्यक न खाणे आदी प्रयत्न करावेत. यांमुळे आताचे विकार लवकर बरे होऊन रोगप्रतिकारक्षमता वाढू शकेल. मार लागणे, भाजणे, बेशुद्ध पडणे आदी प्रसंगी रुग्णावर तात्पुरते उपचार करता यावेत, यासाठी कुटुंबातील एकाने तरी प्रथमोपचार प्रशिक्षण घ्यावे !
 
१आ. मानसिक स्तर
दंगल, भूकंप, महायुद्ध आदींच्या वेळी उद्भवणाऱ्या स्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास संबंधित प्रसंगांचा सराव करण्यासाठी स्वयंसूचना द्यावी! नातेवाइकांमध्ये भावनिकदृष्ट्या न अडकण्यासाठी स्वयंसूचना द्यावी ! आपत्काळातील एखाद्या प्रसंगात काहीच करणे आपल्या हातात नसेल, तर त्या कठीण प्रसंगाकडे तत्त्वज्ञाच्या भूमिकेत राहून किंवा साक्षीभावाने पहाता यावे आणि परिस्थिती आनंदाने स्विकारता यावी, यासाठी स्वयंसूचना द्यावी !
अल्प-अधिक कालावधीसाठी कुटुंबियांचा वियोग सहन करण्याची सिद्धता ठेवावी !
१ इ. आर्थिक स्तर : सध्याची मिळकत (उत्पन्न) आणि आतापर्यंतची बचत काटकसरीने वापरावी ! सध्या बऱ्याच अधिकोषांचे (बँकांचे) आर्थिक घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे स्वतःचे पैसे सुरक्षित रहावेत, यासाठी गुंतवणूक करतांना एके ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने ती गुंतवणूक विविध ठिकाणी करावी.
 
१ ई. आपत्काळाच्या दृष्टीने करायची अन्य सिद्धता : घरात अनावश्यक असलेले साहित्य कमी करण्यास आरंभ करावा ! दोन वेगवेगळ्या आस्थापनांचे सिम कार्ड असलेला भ्रमणभाष जवळ बाळगावा ! नातेवाईक, शेजारी, पोलीस स्थानक, अग्नीशमन दल आदी अत्यावश्यक ठिकाणचे दूरभाष क्रमांक, पत्ते आदी स्वतंत्र वहीतही नोंद करून ठेवावेत !
 
१ उ. आपत्काळाच्या दृष्टीने आध्यात्मिक स्तरावर कोणती व्यवस्था करायला पाहिजे ?
आगामी काळात येणार्‍या भीषण आपत्तींपासून रक्षण होण्यासाठी चांगली साधना करणे आणि भगवंताचे भक्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच प्रयत्नांना आरंभ करा. आमच्यावर देवतेची कृपादृष्टी होण्यासाठी आणि आपल्या सर्व बाजूंनी संरक्षण-कवच बनवण्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी प्रतिदिन कराव्यात. देवपूजा करावी. सायंकाळी देवता आणि तुळशीजवळ दिवा लावून त्याला नमस्कार करावा. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातील सर्व लोकांनी आरामात बसून स्वास्थ्य आणि संरक्षण-कवच प्रदान करणारा श्लोक / स्तोत्र पठण (उदा. रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, हनुमान चालीसा, देवीकवच आदी) करावे. रात्री झोपतांना अंथरूणाच्या चारही बाजूंना देवतांच्या नामजपाच्या सात्त्विक पट्ट्यांचे चौकोनी मंंडल करावे आणि संरक्षणासाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी. आगामी तिसऱ्या विश्‍वयुद्धाच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या परमाणू अस्त्रांच्या क्ष-किरणांचा वातावरणावर जो प्राणघातक प्रभाव पडेल, त्यापासून वाचण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करावे.
(उत्तरार्ध)