करण जोहरच्या घरातील दोन व्याक्तींना कोरोनाची लागण

जनदूत टिम    26-May-2020
Total Views |
मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, बॉलिवूडमधील अनेक कलाकार क्वारंटाईन झाले आहेत. घरातील नोकरांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन होते. आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरातील दोन नोकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जोहर कुटुंब क्वारंटाईन झाले आहे.
 
Karaj johar_1  
 
करण जोहर यांच्या घरातील दोन नोकरांच्या कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. "मी सर्वांना सांगू इच्छितो, की माझ्या घरातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसल्यावर त्यांना लगेच इमारतीमधील वेगळ्या भागात ठेवण्यात आले. आम्ही महापालिकेला माहिती दिली असून, प्रशासनाने आमच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण केले आहे. माझे कुटुंब सुरक्षित आहे आणि त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. सकाळीच केलेली आम्हा सर्वांची स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आली आहे. परंतु, इतरांच्या सुरक्षेसाठी आम्ही 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहोत', असे करण जोहरने ट्विटरवरून कळवले आहे.
 
"पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांनाही चांगले उपचार दिले जातील. माझे कुटुंब सुरक्षित असून, योग्य ती काळजी घेत आहोत', असेही त्याने म्हटले आहे. करणने सोमवारीच 49 वा वाढदिवस कुटुंबासह घरीच साजरा केला. याआधी बोनी कपूर यांच्या घरातील नोकर साहू कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे बोनी कपूर, त्यांच्या मुली जान्हवी आणि खुशी यांच्यासह कुटुंबातील सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते.