भिवंडी तालुक्यात तहसीलदाराच्या आशीर्वादाने माती चोरटयांचा धंदा तेजीत

जनदूत टिम    26-May-2020
Total Views |

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमताने ग्रामपंचायत सदस्यच करतोय गौणखनिजाची लुट

ठाणे : भिवंडी तालुक्यात मोठया प्रमाणात माती उत्खनन सुरु असुन तहसीलदार शशिकांत गायकवाड आपल्या भाड्याच्या दलालांसोबत कार्यालयात थंड हवा खाण्यात मश्गुल झाला आहे.
 
mafia001_1  H x
 
खुलेआम सुरु असलेल्या माती उत्खननाबाबत कोणतीही कारवाई न करता चोरट्यांना रान मोकळे करून दिले असुन नागरिकांना मात्र दोन दोन तास कार्यालयात ताटकळत ठेवले जात आहे. कोरोना वैश्विक महामारीमुळे जिल्ह्यातील प्रशाकीय यंत्रणेमार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.परंतु भिवंडी तालुक्यातील तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना फाट्यावर मारत डोहाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात शासकीय जागेवर उत्खनन सुरु आहे.
 
नागरिकांकडुन वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. याबाबत भिवंडी प्रांत नळदकर यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर नायब तहसीलदार गोसावी यांना तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश देऊन सुद्धा अजुनपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे यामध्ये बडया राजकीय पदाधिकाऱ्यांचा व मातीचोर माफियांचा हात असल्याची चर्चा नागरिकांमधुन ऐकायला मिळत आहे.

Mafia01_1  H x  
भिवंडी उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार गोसावी सुद्धा भ्रष्टाचारी असल्याचे नागरिकांमधुन बोलले जात असतानाच सदरच्या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याने त्यांच्या वरील संशय अजुन बळावला आहे. डोहाळे ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठया प्रमाणात उत्खनन ग्रामपंचायत सदस्य सचिन घोडविंदे, समीर घोडविंदे आणि मनोहर ठाकरे या माती चोरट्यांनी सुरु केल्याची तक्रार भिवंडी तहसीलदार गायकवाड यांना भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकर यांनी जिल्हाधिकारी, ठाणे, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना केली आहे.
 
याबाबत दहा दिवसांपुर्वी राजेश गायकर यांनी तहसीलदार गायकवाड यांना सांगुन मातीने भरलेला हायवा पकडुन दिला होता.परंतु हा हायवा पुन्हा दुसऱ्या दिवशी माती वाहतूक करताना दिसुन येत असल्याने तहसीलदारांनी याबाबत कारवाई केली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर नक्की या माफियांना तहसीलदारांचा आशीर्वाद असल्याने तलाठी भोजने, मंडळ अधिकारी कटावकर यांनी देखील महसूल खात्याच्या जागेतील मातीची होणाऱ्या लुटीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यांच्यासह तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे