वसईत मासळी बाजारात मोठ्या प्रमाणावर झुंबड

25 May 2020 20:18:13
वसई : वसई करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असतानादेखील वसईतील मासळी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
 
suki-masali_1        
वसई-विरार परिसरातील करोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी येथील मासळी बाजारात नागरिकांतर्फे सुरक्षित वावराच्या नियमांची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वसईतील जागरूक नागरिकांतर्फे होत आहे.वसई-विरार क्षेत्रात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील केवळ वसई-विरार क्षेत्राचा रेड झोन समावेश करण्यात आला आहे.
 
करोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यानंतर वसई-विरार क्षेत्राचा नंबर लागत असतानाही वसईतील नागरिक सर्रास घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. त्याची प्रचीती येथील स्थानिक मासळी बाजारात येत आहे. मासळीचे मुख्य बाजार समजले जाणारे पाचूबंदर मासळी बाजार, नायगाव मासळी बाजार आणि अर्नाळा मासळी बाजार येथे सुरक्षित वावर न पाळता नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
 
मासळी विक्रेत्यांकडूनही खबरदारी घेतली जात नाही. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा दोन महिने मासेमारी बंद होणार आहे. त्यामुळे हे शेवटचे १० ते १२ दिवस त्यांच्या हातात असून या दिवसात मासळीविक्री जोरदार सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0