आ. गोपीचंद पडळकर यांचे जंगी स्वागत सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता बट्याबोळ

जनदूत टिम    21-May-2020
Total Views |
सांगली: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. मात्र नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांना या नियमांचा विसर पडल्याचं दिसून आले. नियम धाब्यावर बसवून गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते सांगलीत सार्वजिनक स्वागत कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, नवनिर्वाचीत आमदार पडळकर आणि त्यांचे दहा सहकारी हे कोरोनाग्रस्त रेडझोनमधून म्हणजेच पुणे, मुंबईतून आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
 
Lagna Samarambha_1 &
 
सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असतानाही गोपीचंद पडळकर यांच्या स्वागताचा जय्यत समारंभ आयोजित करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यात प्रवेश करत कवठेमहांकाळ येथील आरेवाडीच्या बिरोबा मंदिर येथे जाऊन आमदार पडळकर यांनी हार आणि तुरे स्वीकारले. कोरोनाचे कोणतेही गांभीर्य न बाळगता गर्दीच्या ठिकाणी जाऊन गोपीचंद पडळकर यांनी हा सत्कार स्वीकारला.
यावेळी स्वागत समारंभाला मोठ्या प्रमाणावर जमली गर्दी जमली होती. सोशल डिस्टन्सिंगची कोणतेही नियम त्याठिकाणी पाळले गेले नाही. कोणतीही सुरक्षितता न बाळगता पुष्पवृष्टी गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आली. त्यानंतर यमगरवाडी येथे पडळकर यांची तुला देखील करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या संकाटाचं भान गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
या संपूर्ण प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन करा, अशी मागणी सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते रेडझोन असलेल्या मुंबई आणि पुण्यातील भागातून आले आहेत. पडळकर यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना होम क्वॉरंटाईन सक्तीचे करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बिचुकले यांनी केली आहे.