केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत १०० पोलीस : अनिल देशमुख

जनदूत टिम    18-May-2020
Total Views |
मुंबई : कोरोनाविरोधाच्या लढाईत महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहेत. केंद्राकडून पाठण्यात आलेल्या दहा तुकड्यांच्या प्रत्येक तुकडीत १०० पोलीस आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
Anil-Deshmukh-3_1 &n
 
“केंद्रीय पोलीस दलाच्या एकूण २० कंपन्या आम्ही मागितल्या होत्या. त्यापैकी १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. यामध्ये ५ तुकड्या रॅपीड अॅक्शन फोर्सच्या, 3 सीआयएसएफच्या तर २ सीआरपीएफच्या तुकड्यांचा समावेश आहे. प्रत्येक तुकडीत 100 पोलीस आहेत”, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
 
“मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि अमरावती अशा ठिकाणी या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. पुढील काळामध्ये रमजान ईद, पालखी आणि गणेशोत्सव आहे. या सर्व सणांमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी आणि पोलिसांना थोडी विश्रांती देण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. बाकीच्या तुकड्यादेखील लवकर महाराष्ट्रात दाखल होतील”, असं अनिल देशमुख म्हणाले. याशिवाय मुंबई पोलिसांना जिथे वाटेल त्याठिकाणी केंद्रीय पोलीस दल तैनात केलं जाईल, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
 
दरम्यान, “महाराष्ट्रात जवळपास २ लाख २५ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत. ते गेल्या २ महिन्यांपासून सातत्याने काम करत आहेत. अनेकांची ड्यूटी क्वारंटाईन सेंटरला तर अनेकांची आयसोलेशन सेंटरला आहे. अनेक पोलीस कर्मचारी चौका-चौकात भर उन्हात काम करत आहेत. स्वत:ची सुरक्षा धोक्यात घालून पोलीस काम करत आहे. याशिवाय आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारीसह राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहे. पोलिसांना सध्या आरामाची गरज आहे”, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (१७ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.