मुख्यमंत्री कमी पडताहेत असं म्हणालोच नव्हतो, तर त्यांना सल्ला दिला : पृथ्वीराज चव्हाण

जनदूत टिम    18-May-2020
Total Views |
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका वार्तालापात चव्हाण यांनी करोनानंतरच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे,' असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याची चर्चा सुरू झाली होती.
 
Prithviraj_1  H
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली. 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठंही म्हटलेलं नाही. प्रशासकीय व्यवस्थेवर मी जरूर बोललो होतो. अनेक अधिकाऱ्यांकडं कुठलीही जबाबदारी नाही तर काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. असं न करता प्रत्येकाला जबाबदारी द्यावी, असा सल्ला मी मुख्यमंत्र्यांना दिला होता. हे ताबडतोब व्हायला हवं, असंही मी म्हटलं होतं. हे सगळं रेकॉर्डवर आहे. ते कुणीही ऐकावं आणि निष्कर्ष काढावा', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
'मुंबई आणि महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत याची आम्हाला सर्वांनाच काळजी आहे. एक लोकप्रतिनिधी आणि नागरिक म्हणून हे कसं आटोक्यात येणार याची काळजी मलाही आहे. त्या काळजीतून मी काही बोललो असेन तर त्यातून कुणी कमी पडतंय असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. खरंतर आघाडीमध्ये विसंगती आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे,' असा आरोपही चव्हाण यांनी केला.