जीवनात उतावीळ होऊन, संयम सोडून यश मिळत नाही -किरण निचिते

किरण नानासाहेब निचिते    15-May-2020
Total Views |
माझ्या अपयशाला कारणीभूत राग असला तरी
सोबतीचे सर्व यशाचे भागीदार आहेत !!!!
माझ्या आयुष्यात इतकी मोठी व्हायरसची साथ मला पहिल्यांदा अनुभवायला आली. यापूर्वी लहान लहान साथी आल्या पण ही अशी पाहिली नव्हती, पण बाकी या साथीतुन जगाला ठप्प करील असे काही प्रकार पाहायला मिळाले नव्हते. ते आज पाहायला मिळत आहे.
 
Angry-in-Dialectal-Arabic
 
अनुभव तर खूपच झाले आहेत. जीवनामध्ये त्याला कमी लेखून चालणार नाही. दररोजच्या जीवनामध्ये दैनंदिन अनुभवात रोज आपण शिकण्यासारखं आहे ते घेतलं आणि शिकण्यासारखा नाही जे चुकीच आहे ते सोडले पाहिजे तरच आपल्या यशस्वितेचे शिखर गाठण्यासाठी कमी कालावधी लागेल.
मित्रांनो आज तब्बल दोन महिने होत आले सबंध जगाला ठप्प केलेल्या या कोरोना -१९ व्हायरस च्या साथीने आपल्याला खूप काही शिकवून गेले आहे. आपण खूप गर्वाने, श्रीमंतीने, अभिमानाने, राजकीय - कौटुंबिक वारसाने, गावकीच्या वारसाने अशा प्रकारच्या एका वेगळ्याच विश्वात जगत असताना मशगुल आणि बेधुंद जीवन जगणाऱ्या मानवजातीला या व्हायरसने जमिनीवर आणण्याचे काम केले आहे.
 
तरुणांनो शुद्धीवर या आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोबाईल ला लांब ठेवा. हीच योग्य वेळ आली आहे. महाराष्ट्रातील मराठी तरुणांना भरपूर संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. किमान १४ ते १६ तास काम करण्याची तयारी असणाऱ्या तरुणांना प्रचंड श्रीमंतीचे दिवस येतील कारण त्यांच्यासाठी व्यवसायाच्या लहान मोठ्या भरपूर संध्या आज मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. नव्हे तर गावातच ही संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
खोट्या स्वाभीमानात न जगता आजच्या तरुणांनी मोबाईल युगाचा फायदा घेऊन जास्तीत जास्त व्यवसायिक भरारी मारण्याची आवश्यकता आहे. भरपूर सार्‍या संध्या उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील परप्रांतीय नागरिक मजूर या ठिकाण आज त्यांच्या त्यांच्या प्रांतात निघून गेलेले आहेत. अशा वेळी संघटितपणे बचत गट असेल, युवक मंडळी असतील, सामाजिक संस्था असतील या सर्वांनी मिळून एकत्रित येऊन एकजुटीने आपापल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, परिसरातील लहान-मोठ्या व्यवसायांचे एकत्रीकरण करून मोठ्या स्वरूपाचा एका गटाचा म्हणून एका संस्थेचा म्हणून असा तो व्यवसाय उभारण्याची संधी आज गावाला गेलेल्या परप्रांतीयांमुळे निर्माण झालेली आहे. या संधीचे सोने करण्याची हीच योग्य वेळ आहे.
मित्रांनो सक्षम व्हा, श्रीमंत व्हा आणि मग समाजसेवा करा आणि त्यानंतर राजकारणाची संधी तुम्हाला आपोआपच मिळेल. परंतु कृपया माझे हात जोडून विनंती आहे. काहीही नसताना राजकारणात पडू नका खूप वेळ वाया जाईल श्रीमंती वाट्याला येणार नाही आणि राजकीय पद सुद्धा आपल्या वाट्याला येणार नाही हे लक्षात असू द्या.
 
Kiran Nichite_1 &nbs
 
जीवनामध्ये संयमाला खूप महत्त्व आहे. संयम राखणारा खूप मोठा होतो. संयमाने वेगवेगळ्या संध्या उपलब्ध होतात त्यामुळे संयम शिवाय जीवन नाही. याची आठवण ठेवून दैनंदिन जीवनात जगण्याचा प्रयत्न करा, तर यश आपल्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. याबाबतीत माझ्याकडून फार काही चुका झाल्या आणि सतत संयम सोडून जगण्याचा प्रयत्न केला तो फक्त समाजासाठी, गावासाठी, विकासासाठी परंतु हा संयम सोडताना वैयत्तिक जीवनामध्ये खूप सारे नुकसान होते याची जाणीव मला आज इतक्या वर्षानंतर झालेली आहे.
 
परंतु जीवनामध्ये जी लोकं सोबत आहेत. सोबत करत असतात ती बऱ्यावाईट सर्व दिवसांमध्ये आपल्या सोबतीला असतात ती खूप काही देऊन जात असतात. त्यामुळे आपल्या आजपर्यंतच्या यशाचे भागीदार तेसुद्धा असतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
 
व्यक्ती म्हणून प्रत्येकाने जगताना जगाच्या रहाट गाड्याबरोबर ओढले जाऊ नका! आपल्या जीवनाची घडी बसवून ती व्यवस्थित सुरळीतपणे पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खूपच निश्चयी राहणे आवश्यक असते, याचबरोबर भरकटून जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंग उद्भवत असतात. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये निश्चय आणि ठाम राहणे अत्यंत आवश्यक आहे. यातून आपले यश हे नक्कीच शिखर गाठत असते याची जाणीव सतत ठेवा.
 
थोडक्यात सांगायचे एवढेच आहे की संयम ठेवा उतावीळ होऊ नका. यश आपलेच आहे. राग, तिरस्कार, भांडण, तक्रार या गोष्टीत वेळ न दवडता आपण आपली मार्गक्रमणा अहोरात्र चालू ठेवणे हीच आपली यशाची खरी पायरी ठरेल. त्यामुळे संकट बघू नका, संकटे येतच राहणार, अडचणी येतच राहणार त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका असे मी निर्धाराने सांगेल. याअगोदर या सर्व बाबतीत माझ्याकडून खुप साऱ्या चुका झालेल्या आहेत. परंतु आज ती परिस्थिती नाहीये त्या सर्व चुकांमधून खूप सारे शिकायला मिळाले आहे, आणि म्हणूनच मला हे आपल्याला थोडक्यात सांगावेसे वाटले.
धन्यवाद