मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

जनदूत टिम    14-May-2020
Total Views |
नाशिक : शुद्धलेखन ठेवा खिशात या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन झाले आहे.
 
Arun-Phadke_1  
 
गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. नाशिक येथे त्यांचे निधन झाले. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं.
भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखननियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल, असे अरुण फडके यांचे मत होते.
 
लेखन नियम आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. अरुण फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवर अपरिमित प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा
परिवार आहे.