करोना : मुंबई पोलीस दलात पाचवा बळी

जनदूत टिम    14-May-2020
Total Views |
मुंबई: मुंबईत करोनाचा कहर वाढत चालला असताना मंगळवारी मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिसाला करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे.
 
Police Logo_1  
 
आत्तापर्यंत मुंबईतील पाच पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, राज्यात ही संख्या आठवर पोहोचली आहे. करोनाबाधित पोलिसांची संख्याही वाढत आहे. राज्यात एक हजारांवर पोलिसांना लागण झाली असून ७९३ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
 
शिवडी पोलिस ठाणे येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मंगळवारी करोनाने मृत्यू झाला. वाघमारे यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलिस दल शोकाकुल झाले आहे. ऐरोली येथे वास्तव्यास असलेल्या वाघमारे यांना पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते मे महिन्याच्या अखेरीस पोलिस सेवेतून निवृत्त होणार होते. राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी वाघमारे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
 
महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देतानाच महासंचालक तसेच विविध श्रेणींमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यासोबतच वाघमारे कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मुंबईसह राज्यभरातील पोलिस आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत आहेत. ही सेवा बजावताना अनेक पोलिसांना करोनाने गाठले असून आत्तापर्यंत मुंबईत पाच, तर राज्यात एकूण आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईनंतर पुणे, नाशिक आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू झाला आहे.
 
मुंबईतील जे. जे. मार्ग पोलिस ठाणे राज्यात सर्वाधिक करोनाबाधित पोलिस असलेले पोलिस ठाणे ठरले असतानाच आता सहार पोलिस ठाण्यातील बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. आधी १४, नंतर १६ वरून करोनाबाधित पोलिसांची संख्या २७वर पोहोचली आहे. या २७ जणांच्या संपर्कात आलेले कर्मचारी आणि अधिकारी यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सहार पोलिस ठाण्यात असलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.