जाणून घेऊ या.. COVID 19 रुग्णालय, आरोग्य केंद्र अन् उपचार केंद्रातील मनुष्यबळ व्यवस्थापन

13 May 2020 17:18:32
जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजना यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत.
 
coronavirus_1  
 
देशात व महाराष्ट्रात सध्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे शासनाने त्याबाबत खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. यानुषंगाने जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार प्रभावीपणे कार्यवाही चालू आहे.
 
त्या अनुषंगाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात COVID 19 रुग्णालये (Dedicated Covid Hospital), कोविड आरोग्य केंद्रे (Dedicated Covid Health Centre) आणि कोविड उपचार केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी कार्य करणाऱ्या मनुष्यबळाचे योग्य प्रकारे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. या रुग्णालयांत कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय तज्ञांपासून ते रुग्णालय स्वच्छता पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांच्या कर्तव्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, याचा विचार करुन शासनाकडून COVID 19 रुग्णालये (DCH), कोविड आरोग्य केंद्र (DCHC) आणि कोविड उपचार केंद्र (CCC) येथे कर्तव्यावर असलेल्या मनुष्यबळाचे व्यवस्थापन करताना पुढील बाबी लक्षात घेतल्या आहेत:-
 
१) उपलब्ध तज्ञ व इतर मनुष्यबळाची सुरक्षा.
२) उपलब्ध तज्ञ व इतर मनुष्यबळाचा पूर्ण क्षमतेने वापर.
 
चक्राकार पद्धतीने कामकाज :-
COVID 19 रुग्णालये (DCH), कोविड आरोग्य केंद्र (DCHC) आणि कोविड उपचार केंद्र (CCC) येथे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी चक्राकार पद्धतीने लावणे आवश्यक आहे.
यात संपूर्ण एक चक्र आहे २१ दिवसांचे राहील.
सात दिवस कोविड भागात (DCH), (DCHC), (CCC) डयुटी, त्यानंतर सात दिवस ड्युटी ऑफ आणि सात दिवस नॉन कोविड भागात ड्युटी लावण्यात यावी.
सात दिवसांच्या कालावधीत त्यांना रुग्णालय परिसरातच राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.
कोविड ड्युटी कालावधीत कर्मचाऱ्यांची रुग्णालय परिसरात किंवा नजिकच्या परिसरातच राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.
 
उपलब्ध तज्ञ व इतर मनुष्यबळ :-
वैद्यकीय विशेषज्ञ:-
कोविड रुग्णालयात भिषकतज्ञ, बधिरीकरण तज्ञ, सोनोलॉजिस्ट यांची महत्त्वाची भूमिका आहे. भिषकतज्ञ सोबतच चेस्ट फिजिशियन असल्यास त्यांची सेवा सुद्धा कोविड रुग्णालयात घेण्यात याव्यात.
नियमित कर्तव्यावर तज्ञाच्या उपस्थितीसाठी कोविड रुग्णालयात (DCH) तज्ज्ञांचे तीन चमू तयार करण्यात यावेत. यामध्ये नियमित तज्ञ तसेच कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या तज्ञांचा समावेश असावा. आय.एम.ए, फिजिशियन असोसिएशन, कन्संल्टंट असोसिएशन यांना संपर्क साधून त्यांच्यातील सेवाभावी तज्ञांच्या सेवा सुद्धा घेण्यात याव्यात.
शक्य असल्यास व उपलब्धता असल्यास इन्टेन्सिव्हिस्ट (Intensivist) आणि हेमॅटोलॉजिस्ट (Hematologist) यांच्या ऑन कॉल सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात.
अतिदक्षता विभागात सहा तासांची ड्युटी लावण्यात यावी. या सहा तासांच्या ड्युटी साठी भिषकतज्ञ किंवा चेस्ट फिजिशियन यांची ड्युटी लावण्यात यावी.
बधिरीकरण तज्ञ, इन्टेन्सिव्हिस्ट (Intensivist) आणि हेमॅटोलॉजिस्ट (Hematologist) उपलब्ध असल्यास त्यांना ऑन कॉल बोलाविण्यात यावे.
या तज्ञांच्या उपलब्धतेनुसार आठ किंवा बारा तासांची ड्युटी लावण्यात यावी.
हे तज्ञ कर्तव्य कालावधीत उपलब्ध राहणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी भिषक तज्ज्ञांची कमतरता आहे तसेच प्रयत्न करूनही उपलब्ध होत नाहीत तेथे भिषकतज्ञांची ऑन कॉल ड्युटी लावावी. ही ड्युटी आठ ते बारा तासांची राहील.
यात भिषकतज्ञ यांनी किमान दोन वेळा विलगीकरण कक्षाला (Isolation Ward) व अतिदक्षता विभागाला (ICU) भेट देऊन तेथील रुग्णांना तपासणे आवश्‍यक राहील.
या कालावधीत भिषकतज्ञांनी शक्यतो रुग्णालय परिसरातच (On Campus) राहावे.
ज्या कोविड आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अतिदक्षता विभाग (ICU) आहे व तेथे नियमितपणे रुग्ण दाखल होतात, त्या ठिकाणी सुद्धा या प्रकारेच ड्युटी लावण्यात याव्यात. ज्या कोविड आरोग्य केंद्रात अतिदक्षता विभाग (ICU) नाही, त्या ठिकाणी भिषकतज्ञाने ऑन कॉल राहून विलगीकरण कक्षाला (Isolation Ward) वॉर्ड मध्ये ड्युटी करावी. कोविड उपचार केंद्रात (CCC) विशेषज्ञांची ड्युटी लावण्यात येऊ नये.
 
एम.बी.बी.एस वैद्यकीय अधिकारी:-
प्रत्येक वेळी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात यावी. विलगीकरण कक्ष (Isolation Ward) व अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये वेगळे वैद्यकीय अधिकारी असावेत. अतिदक्षता विभागातील ड्युटी सहा तासांची राहील. आणि विलगीकरण कक्षातील ड्युटी आठ तासांची राहील. कोविड रुग्णालयीन ड्युटी कालावधी किमान सात दिवसांचा राहील.
 
स्टाफ नर्स :-
कोविड रुग्णालय (DCH)आणि कोविड आरोग्य केंद्रात रुग्णालये (DCHC) प्रत्येक कक्षात एका स्टाफ नर्सची ड्यूटी लावण्यात यावी. स्टाफ नर्सची अतिदक्षता वॉर्डमधील ड्यूटी सहा तासांची असावी. वॉर्डमधील ड्यूटी आठ तासांची असावी.
 
परिचर/कक्षसेवक/वॉर्डबॉय :-
प्रत्येक परिचर/कक्षसेवक/वॉर्डबॉय यांचीसुद्धा अतिदक्षता विभागामध्ये सहा तास आणि विलगीकरण कक्षात आठ तासांची ड्यूटी लावावी. यांचेपण सात दिवसांचे रोटेशन करण्यात यावे. कोविड उपचार केंद्रात आठ तासांची ड्यूटी लावावी व त्यांचे देखील सात दिवसांचे रोटेशन लावण्यात यावे.
 
ड्यूटी कालावधीत घ्यावयाची काळजी आणि क्वॉरंटाईन व विलगीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना :-
सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना मार्गदर्शक सूचनेनुसार हायड्रोक्सिक्लोरीक्विन ची प्रतिबंधात्मक मात्र सुरू करण्यात यावी. सात दिवसांच्या रुग्णालयातील कर्तव्याच्या काळात सर्व तज्ञ आणि कर्मचारी कॅम्पसमध्ये राहतील, याची दक्षता घ्यावी व त्यांना आवश्यकतेप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात.
 
या कालावधीत सर्व तज्ञ व कर्मचारी यांची नॉन-कोविड भागात ड्युटी लावण्यात येऊ नये.
 
प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी रुग्णालयाच्या ज्या भागात कार्य करणार आहेत, त्या भागासाठी आवश्यक केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पी.पी.ई.चा वापर करावा.
 
सात दिवस ड्युटी रजा कालावधीत कर्मचाऱ्यांनी कॅम्पसमध्ये किंवा घरी होम क्वॉरंटाईन राहावे.
कर्तव्य कालावधीत अधिकारी आणि कर्मचारी यांचा पी.पी.ई. न वापरता पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आल्यास हाय रिस्क कॅटेगरी नुसार कार्यवाही करावी.
 
कर्तव्य कालावधीत आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्यात यावी. व आय.एल.आय (ILI) किंवा सारी (SARI) किंवा COVID 19 संशयित असल्यास त्यांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करून त्वरित उपचार देण्यात यावेत.
सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी कर्तव्यावर घेतल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये कर्तव्यावर ठेऊ नये.
साठ वर्षांपुढील कर्मचाऱ्यांना एचटी (HT)/डिएम (DM)/ दुर्धर आजार नाही, याची तपासणी करूनच कर्तव्यावर घेण्यात यावे.
रुग्णालयातील कर्मचारी/अधिकारी यांनी एकत्र जेवण, एकत्र रेकॉर्ड पूर्ण करणे, अशा बाबी करू नयेत.
प्रत्येकाने इतर कर्मचाऱ्यांपासून किमान तीन फूट अंतर ठेवावे.
 
कर्मचाऱ्यास ताप, खोकला, दम लागणे अशी लक्षणे दिसू लागताच त्वरित स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करावे आणि थ्रोट स्वॅब घेण्यात यावा. वरील मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा, प्रभारी मंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई या सर्वांनी कोविड रुग्णालये, आरोग्य केंद्र आणि उपचार केंद्रात स्टाफ रोटेशन करून मनुष्यबळ नियोजन करावे. परिस्थितीनुरुप स्थानिक गरजेनुसार आवश्यकता असल्यास मनुष्यबळाची उपलब्धता आणि सुरक्षिततेचे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.
- मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
Powered By Sangraha 9.0