श्रीकृष्ण आणि दुर्योधन होते व्याही?

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
रामायण आणि महाभारत कालातीत आहे. महाभारत अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील एकेक घटना केवळ स्मरण जरी केल्या, तरी अचंबित व्हायला होते. महाभारतावर अभ्यास करणारी अनेक माणसे आपल्याला भेटतील.
 
Rath_1  H x W:
 
महाभारत म्हटलं की प्रथम आठवतो तो श्रीकृष्ण, भगवद्गीता आणि तुंबळ युद्ध. नीती, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा संगम महाभारतात झालेला आढळतो. श्रीकृष्ण हा महाभारताचा केंद्रबिंदू होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कृष्णनीतीची अनेक उदाहरणे महाभारताच्या निमित्ताने देता येतील. श्रीकृष्णाचे आठ विवाह झाले होते, असे म्हटले जाते. रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. यांना श्रीकृष्णकृपेने मुलेही झाली. हस्तिनापूरचे राजा राजा धृतराष्ट्र यांचा मुलगा दुर्योधन आणि श्रीकृष्ण व्याही होते, अशी एक कथा सापडते. नेमके काय घडले, श्रीकृष्ण-दुर्योधन व्याही कसे झाले, जाणून घेऊया...
 
​सांब-लक्ष्मणा
जाम्बुवंताची मुलगी जामवंती हिचा श्रीकृष्णाशी विवाह झाला होता. जामवंतीला श्रीकृष्णापासून मुलगा झाला. या मुलाचे नाव सांब होते. श्रीकृष्णाप्रमाणे सांब हा १६ कलांमध्ये पारंगत होता. मात्र, याच पुत्रामुळे श्रीकृष्णाच्या कुळाचा अंत झाला, असे सांगण्यात येते. दुर्योधन आणि भानुमती यांची कन्या लक्ष्मणावर सांबचे प्रेम जडले. लक्ष्मणाही सांबवर प्रेम करत होती, अशी एक कथा सापडते. सांब व लक्ष्मणा दोघांनाही विवाह करण्याची इच्छा होती.
 
​दुर्योधनाचे सांबवर आक्रमण
दुर्योधनाला दोन मुले होती. मुलाचे नाव होते लक्ष्मण आणि मुलीचे नाव होते लक्ष्मणा. आपल्या कन्येचा विवाह श्रीकृष्णाच्या मुलासोबत व्हावा, असे दुर्योधनाला अजिबात वाटत नव्हते. या विवाहाला दुर्योधनाचा विरोध होता. मात्र, सांब आणि लक्ष्मणा एवढे एकमेकांच्या प्रेमात गढून गेले होते की, त्यांनी सरळ गंधर्व विवाह केला. लक्ष्मणाला घेऊन सांब आपल्या रथातून जायला निघाला. विवाहाची गोष्ट दुर्योधनाला समजली, तेव्हा त्याचा पारा चढला आणि हस्तिनापूरचे सैन्य घेऊन त्याने सांबवर आक्रमण केले.
 
बलरामाची मध्यस्थी
हस्तिनापूरच्या सैन्याशी सांब एकटा लढू लागला. मात्र, प्रचंड सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. अखेर त्याचा पराभव झाला. कौरव सांबाला पकडून घेऊन गेले आणि कैदेत टाकले. कौरवांनी सांबाला कैद केल्याची वार्ता द्वारकेत पोहोचली. नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी बलराम हस्तिनापूर येथे पोहोचला. मध्यस्थी करून हे प्रकरण शांततेने मिटवावे, असे बलरामाला वाटत होते. सांबला सोडून द्यावे आणि नववधूला द्वारकेला पाठवावे, असे बलरामाने सांगितले.
 
क्रोधित बलराम
बलरामाच्या प्रस्तावाला मात्र कौरवांनी साफ नकार दिला आणि बलरामाचा अपमान केला. काही झाले, तरी कौरव ऐकायला तयार नव्हते. शेवटी बलराम भयंकर क्रोधित झाला. बलरामाने रौद्र रुप धारण केले. कौरवांनी माझे म्हणणे ऐकले नाही, तर हस्तिनापूर नगरी गंगा नदीत बुडवेन, असे आव्हान बलरामाने दिले. मात्र, कौरव ऐकले नाहीत. शेवटी बलरामाने हस्तिनापुरावर नांगर फिरवायला सुरुवात केली आणि हस्तिनापूर नगरी गंगेत बुडवण्यास सुरुवात केली.
 
​अखेर सांबची मुक्तता
बलरामाच्या प्रहारामुळे हस्तिनापुरात हाहाकार माजला. सर्व नागरिक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. बलरामाचे रौद्र रुप पाहून कौरव अत्यंत भयभीत झाले. बलरामाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले. कौरवांनी सांबची मुक्तता केली आणि लक्ष्मणाला द्वारकेला पाठवण्यासही संमती दिली. बलरामाचा राग शांत झाला. त्याने कौरवांना माफ केले आणि सांब-लक्ष्मणाला घेऊन द्वारकेला परतला. द्वारकेत आल्यावर दोघांचाही वैदिक पद्धतीने विवाह लावून देण्यात आला.