दुर्दैवाने महाराष्ट्र सर्वात पुढे

जनदूत टिम    09-Apr-2020
Total Views |
स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील टाळेबंदीचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढू शकेल की काय, अशी भीती आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याचे सूतोवाच केले आहे आणि वेगवेगळ्या पातळींवर तसे संकेत मिळत आहेत. टाळेबंदी जाहीर होऊन दोन आठवडे झाल्यानंतरही, समाजात करोनासंदर्भात पुरेसे गांभीर्य आले नसल्याचे चित्र सरसकट दिसून येत आहे.
 
maharastra map_1 &nb
 
संकट आपल्या अगदी समीप येऊन ठेपेपर्यंत शहाणे व्हायचे नाही, अशी एकंदरीत मानसिकता आहे आणि तीच सध्या मुळावर येत आहे. करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी, सुरुवातीपासून उत्तम नियोजन करणाऱ्या महाराष्ट्रात दुर्दैवाने सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत आणि मुंबई, पुणे या प्रमुख शहरांमध्ये करोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्यामुळे, चिंतेचे ढग गडद झाले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव झालेली एक व्यक्ती तीस दिवसांत ४०६ लोकांमध्ये तो विकार संक्रमित करते, याचा केंद्रीय आरोग्य खात्याच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी पुनरुच्चार करून, गांभीर्याची जाणीव करून दिली. सोशल डिस्टन्सिंग, तसेच मास्क लावणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच या काळात घरात राहणे हाच सुरक्षित राहण्याचा आणि करोनाशी मुकाबला करण्याचा सर्वाधिक प्रभावी मार्ग असल्याचे, अनेक आघाड्यांवरून सांगितले जात आहे. त्याचा किती परिणाम होतो, हे आसपासच्या परिस्थितीकडे बघून लक्षात येते. देशभरातील करोना रुग्णांची संख्या आज चार हजार ४२१ असून, चोवीस तासांत ३५४ नवे रुग्ण आढळले आहेत आणि आठ मृत्यू झाले आहेत. देशातला एकूण मृत्यूंचा आकडा ११७ झाला आहे.
 
मुंबईपाठोपाठ पुण्यातही परिस्थिती गंभीर बनत चालली असून, मंगळवारी सकाळी करोनाबाधित तीन रुग्णांच्या मृत्यूच्या बातमीमुळे चिंतेत आणखी भर पडली. ससून रुग्णालयात मरण पावलेल्या तिघांचे वय साठ वर्षांपेक्षा अधिक होते आणि त्यापैकी दोघांना मूत्रपिंडाचा विकार, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, तरीही ते बळी करोनाचे म्हणूनच गणले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही अनेक भाग सील होत असून, मध्य पुण्याचा बहुतांश भाग त्यात आहे. पुण्याबरोबरच मुंबई शहरालगतचे ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली येथेही करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, मुंबईप्रमाणेच या परिसरातील वातावरणही चिंतेत भर टाकणारे आहे. ठाणे परिसरात बावीस, तर कल्याण-डोंबिवली परिसरातील रुग्णांची संख्या तीसच्या जवळपास पोहोचली आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर एक आठवड्याने उठणारी टाळेबंदी आणखी काही दिवस वाढू शकते. अर्थात, संकटाच्या मुकाबल्यासाठी सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्यास त्याला विरोध असण्याचे कारण नाही; परंतु असे निर्णय घेताना मानवीय दृष्टी आणि व्यावहारिकताही तपासावी लागते. टाळेबंदी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरेसा कालावधी दिला नाही आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही व्यावहारिक पावले टाकली गेली नाहीत; त्यामुळे हजारो लोक विनाकारण मुंबईत अडकून पडले आहेत. सध्याच्या काळात मुंबईत अडकून राहण्याएवढी कठीण गोष्ट कुठलीही नाही. मुलांच्या शाळा नाहीत, लोकांना रोजगार नाहीत, अशा स्थितीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या सात-आठ लोकांना घरातच थांबा म्हणून सांगणेही अमानवीय आहे. या लोकांना गावी जाण्याची परवानगी दिली असती आणि त्यांच्या त्यांच्या गावात दोन आठवडे त्यांचे विलगीकरण केले असते, तरी त्यांचे जगणे सुसह्य झाले असते. आता हे लोक त्रासात आहेत आणि मुंबईच्या यंत्रणेवर त्यांचा ताणही वाढतो आहे. त्यामुळे टाळेबंदी वाढणार असेल, तर अशा लोकांबाबत सरकारने चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातून सरकारचा मानवी चेहरा दिसून येईल.
 
या पार्श्वभूमीवर विचार केला, तर महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे. राज्याच्या विविध शहरांतूनही किरकोळ स्वरूपात नवे रुग्ण आढळत असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यातील रुग्णांचा आकडा नऊशेच्या घरात पोहोचला आहे, यावरून एकूण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. अर्थात, त्यातील पाचशेहून अधिक रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. निजामुद्दीन येथून बाहेर पडलेल्या तबलीग जमातीच्या लोकांनी गेल्या आठवड्यात घोळ घातल्यानंतरची परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी करोनाच्या रुग्णांचा आकडा काही कमी होत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक भीती होती, ती मुंबई शहराचीच. येथील झोपडपट्टी तसेच जुन्या वस्त्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने लोक राहतात आणि सोशल डिस्टन्सिंगच्या तत्त्वाचे पालन करणे त्यांच्यासाठी कोणत्याही पातळीवर शक्य नसते. करोनाने अशा ठिकाणी शिरकाव केला, तर त्याला आटोक्यात आणणे कठीण जाईल, अशी भीती होती आणि ती खरी ठरण्याची चिन्हे आहेत. धारावी झोपडपट्टीसह अन्यही काही झोपडपट्टी परिसरांत करोनाचे रुग्ण सापडल्यामुळे, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकार यांची चिंता वाढली आहे. महापालिका आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे उपाययोजना करीत असली, तरी या ठिकाणी फैलाव रोखणे कठीण असल्याची परिस्थिती आहे आणि सध्याच्या काळात तीच समोर उभी ठाकली आहे. मुंबईत महापालिका, पोलिस व आरोग्य विभागाच्या यंत्रणा अहोरात्र झटत असून, सुमारे दीडशे वसाहती, परिसर सील करण्यात आले आहेत. संशयितांना ओळखण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहेत. सध्याच्या टाळेबंदीमुळे हळूहळू संसर्गाचे प्रमाण आणि रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा सगळ्यांच यंत्रणांना आहे; परंतु समोर येणारे चित्र फारसे आशादायी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घर असलेल्या वांद्रे येथील 'मातोश्री'च्या परिसरातील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने, परिस्थितीत गांभीर्य वाढले आहे.