मुंबईत एकाच दिवशी २ रुग्णालये सील!

जनदूत टिम    07-Apr-2020
Total Views |
मुंबई: मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयाबरोबरच जसलोक रुग्णालयही सील करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने आज हा निर्णय घेतला. वोकहार्ट रुग्णालयाचे ३ डॉक्टर व २६ नर्सेसना करोनाची लागण झाली आहे तर जसलोक रुग्णालयाच्या १० जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
hospital_1  H x
 
वोकहार्ट आणि जसलोक रुग्णालयातील स्टाफला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही दोन्ही हॉस्पिटल सील करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जसलोकचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तातडीने बंद करण्यात आला आहे. जसलोकमधील सहा नर्सेससह १० कर्मचाऱ्यांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून या सर्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. या रुग्णालयातील रुग्णांच्या संपर्कातील लोकांशीही संपर्क साधण्यात येत आहे. वोकहार्ट: २७ मार्च रोजी वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. त्याची अँजिओप्लास्टी करायची होती. मात्र यादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या स्टाफलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. व्यापक तपासणी केली असता रुग्णालयातील २६ नर्सेस आणि ३ डॉक्टर करोनाबाधीत असल्याचे समोर आले.
 
जसलोक: जसलोक हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम एका नर्सला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ही नर्स ज्या रुग्णाच्या संपर्कात आली होती त्या रुग्णामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. दरम्यान, वरळीतील बीडीडी चाळीत राहत असलेल्या जसलोकमधील एका वॉर्डबॉयलाही करोना झाल्याचे समोर आल्याने एकच
खळबळ उडाली.