राज्यात आज करोनाचे १२० नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ८६८ वर

जनदूत टिम    07-Apr-2020
Total Views |
मुंबई: राज्यात करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात करोनाचे १२० रुग्ण सापडले असून, एकूण बाधितांची संख्या ८६८वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत ६८, तर पुण्यातही ४१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं चिंतेत आणखी भर पडली आहे. राज्यात करोनामुळे आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. करोनामुळे आतापर्यंत ६० वर्षांवरील जवळपास २० ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींना करोनाची सर्वाधिक लागण झाल्याचंही आढळून आलं आहे.
 
virus_1  H x W:
 
मुंबईत ६८ नवे रुग्ण सापडले आहेत. अनेक परिसर सील करण्यात येत आहेत. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयाबरोबरच जसलोक रुग्णालयही सील करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने आज हा निर्णय घेतला. वोकहार्ट रुग्णालयाचे ३ डॉक्टर व २६ नर्सेसना करोनाची लागण झाली आहे तर जसलोक रुग्णालयाच्या १० जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ टीम काम करत आहेत. तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.