कोरोनाचा धोका वाढला, देशात लॉकडाऊन असताना सांगोला तालुक्यात पार पडली बैलगाडी शर्यत

04 Apr 2020 01:01:31
सोलापूर : कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर या घेरडी तालुका सांगोला यांच्यासह अज्ञात दहा बैलगाडी चालाकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
bullock race_1   
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले असताना सांगोला तालुक्यातील घेरडी येथील अतीउत्साही लोकांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसून येत आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने घोडागाडी व बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली असताना या आदेशाचा भंग करत ऐन संचारबंदी काळात ३१ मार्च रोजी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे ५ बैल व घोडा जोडीच्या गाड्यांची शर्यत घेत साधारणतः सहा किमी पळवले होते. बैल व घोडा जोडीच्या गाड्या जोरात पळविण्यासाठी चाबकाने मारण्याचा प्रकार घडला आहे. सदर घडनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्यात शर्यीतीचे आयोजक संतोष नामदेव खांडेकरसह अज्ञात १० चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
Powered By Sangraha 9.0