तबलीगी जमात चे संमेलन

जनदूत टिम    03-Apr-2020
Total Views |
करोना साथीचे निर्बंध अस्तित्वात यायच्या पूर्वी फेब्रुवारीच्या मध्यात मलेशियात तबलीग़ची मोठी बैठक झाली. न्यू यॉर्क टाइम्सने तिचे वर्णन ‘दक्षिण आशियाई देशांतील सर्वात मोठे विषाणू प्रसार केंद्र’ असे केले यातच सर्व काही येते. त्या बठकीस सहभागी झालेल्यांतील तब्बल ६२० जणांना करोनाने गाठले. शेजारील ब्रुनेईत सर्वच्या सर्व ७३ रुग्ण हे त्या बठकीतील सहभागी निघाले. थायलंडमधील सुरुवातीच्या १० रुग्णांतील आजाराचा उगम त्या संमेलनात होता. तिथून उठून हे सर्व धर्मवीर दिल्लीतील ‘तबलीगी’च्या अधिवेशनात सहभागी झाले असावेत असे मानण्यास जागा आहे. या दिल्ली संमेलनाशी संबंधित अनेकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. या आजाराचा जम्मू-काश्मिरातील एकमेव बळी या संमेलनातील सहभागी. तेलंगणा, आंध्र, तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांत या आजाराचे आढळून आलेले रुग्ण या दिल्ली संमेलनाशी निगडित आहेत. याचा अर्थ धर्म प्रसारार्थ झालेले हे संमेलन अनेकांच्या जिवावर उठले. धर्म आणि हिंसा यांच्यात असलेले नाते आणि धर्माभोवती फिरणारे राजकारण लक्षात घेता जे काही झाले त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे मिळणे सर्व धर्मीयांसाठी आवश्यक असले तरी इस्लाम धर्मीयांसाठी ते अधिक आवश्यक आहे. कारण त्याच्यावर आगामी राजकारणाचा पोत ठरू शकतो.
 
राजधानी दिल्लीत दोन आठवडय़ांपूर्वी भरलेले ‘तबलीगी जमात’चे संमेलन हे करोना विषाणूचे सर्वात मोठे प्रसार केंद्र बनल्याचे समोर येते. हे शहाण्यासुरत्या जनांसाठी धक्कादायक असले तरी विचार गहाण ठेवून धर्माच्या मागे जाणाऱ्यांची वाढती संख्या अनुभवणाऱ्यांसाठी अजिबात तसे नाही. आजही आपल्याकडे देशभरात भरणाऱ्या विविध धार्मिक जत्रा आणि मेळे यांत चेंगराचेंगरीपासून होणाऱ्या विविध दुर्घटनांत प्राण गमावलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. पण म्हणून धार्मिक उत्सवांना सर्व शहाणपणा मागे ठेवून गर्दी करणाऱ्यांच्या संख्येत तसूभरही घट झालेली नाही. तेव्हा जे ‘प्रगत’ म्हणवून घेणाऱ्या हिंदू धर्मास साध्य झाले नाही ते इस्लामला शक्य होईल असे मानणे हे दुसऱ्या अर्थी ‘धर्माधतेचे’ लक्षण. ‘तबलीगी जमात’चे मेळेच मुळात भरतात ते धर्म प्रसाराच्या उद्देशाने. इस्लाममधील सुन्नी पंथीयांच्यात एकोपा वाढीस लागून त्याचा धर्म प्रसारास उपयोग व्हावा या हेतूने भारतातील देवबंदी मुसलमानांत साधारण शंभर वर्षांपूर्वी ही संघटना अस्तित्वात आली. असे पहिले ‘तबलीगी’ संमेलन १९४१ साली भरल्याची नोंद असून त्यास पंचवीस हजारांची उपस्थिती होती.
 
फाळणीनंतर पाकिस्तानातही या संघटनेचा शाखाविस्तार झाला आणि आता तर ती जागतिक पातळीवर काम करते. त्याचमुळे दिल्लीतील अशा मेळाव्यास अनेक परदेशी मुल्लामौलवी हजर म्हणून इस्लाम धर्मीयांनी तातडीने सर्व प्रकारच्या धार्मिक संमेलनांवर स्वत:हून बंदी घालायला हवी. तशी ती घालणे त्यांच्याही हिताचे असले आणि समजा ते त्यांच्या लक्षात येत नसले तरी त्यांनी ही बंदी घालायला हवी कारण ते अन्यांच्याही हिताचे आहे. करोनाचा संसर्ग धर्म पाळत नाही. म्हणजे मुसलमानांकडून त्याचा संसर्ग अन्यांनाही होण्याचा धोका आहे. त्यामुळे धर्मप्रेमात आकंठ बुडालेल्या इस्लाम धर्मीयांना करोना संसर्गाची भीती समजा नसली तरी त्यांनी ती अन्य धर्मीयांच्या हितासाठी बाळगायला हवी. हे असे करायचे याचे कारण आताच समाजाच्या एका घटकातील कुजबुज आघाडी सक्रिय झाली असून ‘त्यांच्या’मुळे हा आजार आपल्याकडे कसा पसरत चालला आहे आणि यामागे कसा आंतरराष्ट्रीय कट आहे याच्या सुरस कहाण्या पसरवू लागली आहे. आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅप माध्यमातील सखोल वाचनावर पोसला जाणारा एक मोठा वर्ग आहे. स्वान्तसुखाय अशा या वर्गाकडून या कुजबुजीचे रूपांतर राजकीय मोहिमेत होण्यास वेळ लागणार नाही. तसे झाल्यास त्याचा मोठा राजकीय फटका पुन्हा एकदा अल्पसंख्य समाजालाच बसणार हे उघड आहे.
 
याचे कारण दुर्दैवाने आपल्या घटनेतील सेक्युलर- निधर्मिकता- हे तत्त्व केवळ अल्पसंख्यांशी जोडले गेलेले आहे आणि याची आपणास जाणीव नाही. वास्तविक सेक्युलर या तत्त्वाची गरज अल्पसंख्याकांपेक्षा ८५ टक्के हिंदूंना अधिक आहे. धर्माच्या गुलामगिरीतून मोकळे करून माणूस म्हणून विकासाच्या सर्व संधी या ८५ टक्क्यांना मिळाल्या तर उर्वरित १५ टक्क्यांच्या विकासाचा महामार्गही आपोआप खुला होतो. विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणत त्याप्रमाणे, ‘मुसलमानांचे आता भारतात काय, त्यांनी पाकिस्तानात जावे,’ असे वाटणाऱ्यांना मुसलमानांना त्या देशात हुसकावून लावावे असे वाटत असले तरी त्यासाठी त्याआधी सर्व हिंदूंना प्रथम एका ध्येयवादाने एकत्र आणावे लागेल.
 
जात, पात, पंथ, वर्ण आदीत विभागल्या गेलेल्या हिंदू समाजासाठी हे आव्हान मुसलमानांना सुधारण्यापेक्षाही अवघड, असे कुरुंदकर म्हणत. हे सत्य अनेकांना पचणे जड. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वत: सोडून अन्य सर्वास अनीतिमान समजते त्याप्रमाणे ती स्वत:च स्वत:ला आपण जात/ पात काही पाळत नसल्याचे प्रमाणपत्रही देत असते. म्हणून आपण हिंदू आहोत म्हणजे सेक्युलरच आहोत असे अनेकांना केवळ सवयीने वाटत असते. अशा वातावरणात आपले या भूमीवर हिंदूंइतकेच प्रेम आहे हे मुसलमानांना सिद्ध करत राहावे लागेल. आधुनिकतेकडे पाठ फिरवत आंधळेपणाने धर्मतत्त्वांचे आचरण करीत राहिल्यास तो धर्म त्यांना या देशावर प्रेम करू देणार नाही. म्हणजे त्यासाठी मुसलमानांना खऱ्या अर्थाने सेक्युलर- निधर्मीवादी- व्हावे लागेल. आणि मुसलमानांनी तसे व्हावे अशी इच्छा असेल तर हिंदूंना प्रथम पूर्णाशाने तसे व्हावे लागेल.