आजचे एकांत पसाय दान

जनदूत टिम    28-Apr-2020
Total Views |

Corona_1  H x W 
 
आता सर्वात्मके देवे ।
विनाकारण न फिरावे ।
घरीच बैसोनि द्यावे ।
एकांतदान हे ॥ १॥
एकमेका कर न मिळवावे
दुरुनीच नमस्कारावे ।
अंतर सुरक्षित राखावे ।
परस्परांमाजी ॥ २॥
सदासर्वदा हात धुवावे ।
रुमालाविणा ना शिंकावे ।
कोमट जल प्राशावे ।
थंड वर्जावे सर्वथा ॥ ३॥
घरी बसण्याचा येता कंटाळा ।
जोपासावी एखादी कला
मदत करावी गृहिणीला ।
पुण्य लागे ॥ ४॥
करा स्वच्छता सदनाची ।
त्याच बरोबर तनाची ।
काढा जळमटे मनाची ।
शूचिर्भूत व्हावया ॥ ५॥
मनन आणि चिंतन ।
थोडा वेळ नामस्मरण ।
चुकविता येईल मरण ।
तुम्हासहित इतरांचे ॥ ६॥
आजपावेतो खूप पळाला
दे विश्रांती थोडी शरीराला
सादर व्हावे समयाला ।
संत वचन हे ॥ ७॥
आहे विषाणूचे संकट ।
करी मनाला बळकट ।
सकारात्मकतेचे उभारी तट।
सभोवताली ॥ ८॥
वेळ नव्हता म्हणोन ।
केले नसेल वाचन ।
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन ।
आता तरी वाचावा ॥ ९॥
आयुष्यभर पुरेल ।
पुरोनिया उरेल ।
ग्रंथांची रेलचेल ।
संतकृपेकरोनी ॥ १०॥
आवाहन करी वारंवार ।
केंद्र व राज्य सरकार ।
धोका वाढेल फार ।
बेफिकीरिने ॥ ११॥
खाकी वर्दी आणि डॉक्टर
सोबत स्वच्छता कामगार
काळजी घेती तत्पर ।
सकल जनांची ॥ १२॥
हेही दिस जातील निघोन
उद्या येईल आशेचा किरण ।
तोवर संयमाचे पालन ।
करावे मनुजा ॥ १३॥
येथ म्हणे श्री निसर्गरावो ।
कोरोना ना पसरावो ।
स्वच्छतेचे गीत गावो ।
जनकल्याणहेतू ॥ १४॥
- व्हायरल