गावाकडे परतलेल्या स्थलांतरीत लोकांना मनरेगातून रोजगार द्या

25 Apr 2020 11:57:55
परंडा : कोरोना प्रादुर्भाव व लाॅकडाऊनमुळे गावाकडे आलेल्या स्थलांतरीत लोकांची मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत संख्या खूप मोठी असून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याने या लोकांना केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेतून रोजगार हमी योजनेची कामे काढून रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.
 
SujitSibh Thakur_1 &
 
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्त आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात जास्त प्रमाणात लोकसंख्या ग्रामीण भागात असून सततचा दुष्काळ, नापिकी, उद्योग धंद्याचा सिंचनाचा अभाव, महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी प्रमाण यामुळे कामधंदा, रोजगाराच्या शोधात आपल्या उदरनिर्वाहाकरिता मराठवाड्यातील स्थलांतरीत लोकांची संख्या खूप मोठी आहे.
कोरोना प्रादुर्भाव व लाॅकडाऊनमुळे उदरनिर्वाहासाठी अन्य मोठ्या शहरांत स्थलांतरीत झालेले मजूर, कामगार लोक आपल्या गावाकडे आले आहेत. येत आहेत.
 
केवळ एका उस्मानाबाद जिल्ह्यात गावाकडे परतलेल्या स्थलांतरीतांची संख्या ७५ हजारांच्या जवळपास झाली आहे. तर मराठवाड्यात १० लाखाहून अधिक होईल. पुढे लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर ही संख्या अधिक वाढेल. तीव्र कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे अन्य मोठ्या शहरात आपल्या कामाच्या ठिकाणी लवकर परत जाणेही शक्य होणार नाही. या सर्वांच्या रोजी रोटीचा मोठा प्रश्न आहे. तसेच गावातील लोकांनाही या काळात कामांची आवश्यकता आहे.
 
या पत्रात आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, मराठवाड्यातील सर्व गावांत तसेच क वर्ग नगरपरिषद व नगरपंचायतीच्या हद्दीत केंद्र सरकारच्या मनरेगा अंतर्गत जलसिंचन, जलसंधारण, वृक्ष लागवड, जोड रस्ते, शेत रस्ते, अंतर्गत रस्ते, सिंचन विहिरी, पून:रभरण, शेततळे, तलावांतील गाळ काढणे, माती नाला, गॅबीयन बंधारे, भूसुधार, बांधबंदिस्ती, शौचालय, तूती, गांडूळ खत युनिट आदी सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे प्रशासनातील विविध यंत्रणांचा वापर करून त्यांना उद्दिष्ट निश्चित करून काढावित.
 
कामे सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) राखून करता यावीत यासाठी मजूर क्षमतेच्या दुपटीहून अधिकची कामे काढावी लागतील. दवंडी, पुरेशी प्रसिद्धी करून गावातील इच्छुकांचे रोजगार सेवक, तलाठी, ग्रामसेवक यांनी फार्म ४ भरून घेऊन पुरवणी नावे करून त्यांना मजूर पत्रिका तात्काळ देऊन मनरेगा अंतर्गत तातडीने कामे काढून या कठीण परिस्थितीत गावाकडे परतलेल्या व गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0