बिल गेट्सकडून नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक

जनदूत टिम    23-Apr-2020
Total Views |
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार करोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी जी पावलं उचलत आहे, त्याचं बिल गेट्स यांनी पत्र लिहू कौतुक केलं आहे.
 
Bill-Gates-Narendra-Modi_
 
“करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आहेत त्याचं आणि तुमच्या नेतृत्वाचं मी खरंच कौतुक करतो. देशातील हॉटस्पॉट ओळखून करोना बाधित रुग्णांना क्वारंटाइन करणं, लॉकडाउन जाहीर करणं, आरोग्य यंत्रणेला पाठींबा देण्यासाठी उचललेली पावलं हे प्रशंसनीय आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासोबतच डिजीटल इनोव्हेशन या गोष्टीवरही सरकारने चांगला भर दिला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार डिजीटल प्रणालीचा योग्य वापर करत आहे याचं मला कौतुक आहे. करोना विषाणूसंदर्भात सर्व वैद्यकीय सुविधेची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आरोग्य सेतू अ‍ॅप, त्यावर करोना बाधित क्षेत्राची मिळणारी माहिती या सर्व गोष्टी दाद देण्यासारख्या आहेत”, अशा शब्दांमध्ये गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे.
 
करोनाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं होतं. याव्यतिरीक्त देशात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आणि प्रादूर्भावही काही प्रमाणात आटोक्यात येत आहे.