खरं बोला विश्‍वासराव, वाधवानने किती दिले ?

संग्राम निकाळजे    14-Apr-2020
Total Views |
‘देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे... घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे’ असे म्हणत विंदांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून देण्या-घेण्याचे महत्त्व विशद केले होते. परंतु कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देण्या-घेण्याचे असे उद्योग कायदा फाट्यावर मारुन केले जातात, हे परवा घडलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान प्रकरणाने समोर आलेले आहे.
 
Vishwasrao_1  H
 
गेल्या दीड वर्षापासून वाधवानला वाचविणारे हात अनेकांनी शेणाने बरबटून घेतले आणि त्याच हातांनी वाधवानचा मलिदाही हाणला. परंतु लबाडी फार काळ टिकत नाही, हे वाधवानच्या प्रकरणाने पुन्हा एकदा पहायला मिळाले. वाधवानच्या निमित्ताने अमिताभ गुप्तांची विकेट तर गेलेलीच आहे. पण त्याचबरोबर कोल्हापूरचे तत्कालीन आयजी विश्वास नांगरे-पाटील व सातारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचीही विकेट जाण्याच्या मार्गावर आहे.
 
ज्येष्ठ सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सरंजामशाहीचे खूळ अधिकाऱ्यांच्या डोक्यातून उतरविण्यासाठी पत्रव्यवहार, संचिका आणि मोबाईल मॅसेजमध्ये नावाच्या अगोदर सर, माननीय, साहेब अशा विशेष व सरंजामशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या संज्ञा वापरु नयेत, असे परिपत्रक काढून राज्यघटनेचा खऱ्या अर्थाने सन्मान केला होता. शासकीय कार्यालयात किंवा राजकीय वर्तुळामध्ये कनिष्ठांना सापत्नभावाची वागणूक देण्यात येते, तसेच कार्यालयात आलेल्या नागरिकांचाही अशाच पद्धतीने उपमर्द केला जातो. ब्रिटिशाच्या जोखडातून देश स्वतंत्र झाला, पण या देशातीलच नोकरशहांनी हा देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात नेण्याचे काम केले आहे.
 
सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी हा खरेतर लोकसेवक असतो. लोकांची सेवा करण्यासाठीच शासनाने त्याची नेमणूक केलेली असते. परंतु अमिताभ गुप्ता, नांगरे-पाटील, श्वेता सिंघल यांच्यासारखे अधिकारी स्वत:ला लोकसेवक न समजता जनतेला सेवक समजतात. खऱ्या अर्थाने यांना भारताचे संविधान समजलेच नाही. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या शिकवणीला या तिघांनाही पाठवले पाहिजे. तर आणि तरच या तिघांनाही आपण लोकसेवक असल्याचा साक्षात्कार होईल.
 
साधारणत: दीड वर्षापूर्वी दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ६ व ७ नोव्हेंबर २०१८ रोजी महाराष्ट्राचे नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वरात हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या घरघरीने अख्खे महाबळेश्वर हादरले. अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी आपली चिल्लीपिल्ली पंखाखाली घेतली. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर होवूनसुद्धा महाबळेश्वरात अनिल अंबानी व कपिल वाधवानचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. ऐन हंगामामध्ये कोणीतरी तालेवारच आला असणार, अशी चर्चा महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये घुमू लागली. मात्र त्याच रात्री महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टरचे बेकायदेशीर लॅण्डिंग तसेच टेक ऑफ झाल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना समजली. कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकाऱ्याला ही गोष्ट खटकली. त्यांनी तत्काळ महाबळेश्वर तहसिलदारांकडे याबाबतची माहिती विचारली. त्यावेळी या दोन्ही हेलिकॉप्टरनी कोणतीही परवानगी न घेता लॅण्डिंग तसेच टेक ऑफ केल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवले. परंतु ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायचाय, त्या काही साध्यासुध्या आसामी नव्हत्या. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, हे अंबानी, वाधवानना समजताच त्यांनी थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे - पाटलांना फोन फिरवून ‘अरे क्या यार विश्वास, तेरे टेरीटरी में हम पे एफआयआर दाखिल होने जा रहा है’ वाधवानचे हे शब्द कानावर पडल्यानंतर नांगरे - पाटलांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
 
लागलीच सातारच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना फोन फिरवून ‘कोण तो महाबळेश्वरचा ठाणेदार? जास्त शहाणा झालाय का? त्याची ताबडतोब उचलबांगडी करा’ असे ऑफ द रेकॉर्ड पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आल्यामुळे हुकूमाचा ताबेदार असणाऱ्या पोलीस अधीक्षकाने तत्काळ हेलिकॉप्टर प्रकरण उकरुन काढले म्हणून नाळेंची बदली महाबळेश्वर पोलीस ठाण्यातून तडकाफडकी फलटण शहरला केली. परंतु एव्हाना ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली होती. यासंदर्भात त्यावेळी माध्यमांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु याचा ना जिल्हा प्रशासनावर फरक पडला, ना पोलीस यंत्रणेवर. परंतु अंबानी व वाधवानसारख्या धनदांडग्यांच्या विरोधात तक्रार द्यायला एकही माईचा लाल धजावला नाही. याबाबतची तक्रार सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे दि. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासनाने वाधवान व उद्योगपती अविनाश भोसलेंच्या दबावाखाली येवून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. वास्तविक या घटनेच्या तीन महिने अगोदरच पाचगणी येथे एकाने अशाचप्रकारे हेलिकॉप्टरचे विनापरवाना लॅण्डिंग तसेच टेक ऑफ केले होते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुढे होत स्थानिक मंडलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही घटना एकाच तालुक्यात घडूनही त्यांना वेगवेगळा न्याय का? असा प्रश्नही त्यावेळी उपस्थित झाला होता. परंतु वाधवान व भोसलेंचे पैसे खावून कोडग्या झालेल्या जिल्हा प्रशासनाने त्या बेकायदेशीर लॅण्डिंग तसेच टेक ऑफ संदर्भात वर्ष उलटूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. जिल्हा प्रशासनाला सळो की पळो करुन सोडल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा फार्स करीत आपल्या गळ्यातील फास जिल्हा पोलीस प्रमुखांच्या गळ्यात सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तू कर, तुम्ही कराच्या नादात दीड वर्षे उलटूनही यासंदर्भात गुन्हा दाखल होवू शकला नाही. कारण कोडग्या अधिकाऱ्यांनी जर ठरवले तर काहीही शक्य आहे, हे या प्रकरणामुळे प्रकर्षाने समोर आलेले आहे. २६/११ चा हल्ला मुंबईवर झाला. या हल्ल्यामध्ये अनेकजण पवित्र होवून निघाले.
 
अनेकजण देशाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करुन शहीद झाले. परंतु काही चमको मात्र ९ एमएम घेवून पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसून लाईमलाईटमध्ये आले. मात्र अशी पुण्याई फार काळ टिकत नाही, एक न एक दिवच चमकोगिरीचा बुरखा फाटतोच. केवळ मन में है विश्वास म्हणून चालत नाही, तर हा विश्वास मराठीजनांनी पानिपतच्या युद्धामध्येच गमावलेला आहे. परंतु असे विश्वास पदोपदी आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. पेज थ्री लाईफस्टाईल अंगिकारताना आपला कोकरुडचा भाषिक हेल सोडून पुण्यामुंबईची भाषा बोलताना कधीकधी जीभ घसरतेच, नेमका त्याचवेळी बल्ल्या होतो. टिळेकरांच्या मराठी तारका कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात नाचवून नक्की कोणी काय हाशील केले, हे कोल्हापूर परिक्षेत्रातील साधा शिपाईही सांगू शकतो. त्यामुळे कोणाची नीयत काय आहे, हे कोल्हापूर परिक्षेत्रात येणारा सामान्य नागरिकही सांगू शकतो. चमकोगिरी तर केली पण साधे एक रुपयाचे कल्याण ही पोलिसांचे झाले नाही. संपूर्ण जगाची चिंता यांनाच असल्यासारखे हे सतत वावरत असतात. वीतभर कामगिरीच्या हातभर प्रसिद्धीसाठी हे कायमच प्रसिद्धीलोलूप राहिलेले आहेत. सतत खोटे बोलायचे, दिल्लीवरुन पुण्यात केवळ सात तासांत घोडा आणायचा, असे काही अकलेचे तारे तोडून लोकांचे मनोरंजन करायचे आणि त्याच मनोरंजनातून पैसा कमवायचा. जन्मतारीख ७३ ची, पण २४व्या वर्षी पाचव्या प्रयत्नातून ओबीसीच्या कोट्यातून सनदी अधिकारी व्हायचे, याला फक्त मनातलाच विश्‍वास पाहिजे. भानगडी काढायच्याच तर अनेक निघतील. परंतु समझनेवाले को इशारा काफी है.
 
दि. ११ एप्रिल रोजी सातारा येथील आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन आयजी व सध्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सातारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. वास्तविक वाधवानच्या प्रकरणात या दोघांचा काय संबंध? तर आपणांस हा लेख वाचून सर्वकाही लक्षात आले असेलच. यासाठी वेगळे काही सांगण्याची गरज उरलेली नाही. देशात टाळेबंदी असताना वाधवानसारखा मुजोर उद्योगपती केवळ पैशाच्या जोरावर गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्तांच्या पत्रावळीवर सुमारे दोनशे किलोमीटरचा पल्ला पार करीत महाबळेश्वर गाठतो. २०० किलोमीटरच्या या प्रवासात शेकडो चेकपोस्ट असताना परिंदा भी पर मार नहीं सकता, अशी परिस्थिती असताना वाधवान २३ लोकांच्या चमूसह महाबळेश्वरात पोहोचतो. सध्याच्या घडीला स्वप्नवत असणारी ही गोष्ट केवळ अमिताभ गुप्तांच्या एका पत्रामुळे शक्य होते, म्हणजे कायद्याची अंमलबजावणी सर्वसामान्यांनीच करायची, ढुंगणावर काठ्या सामान्यांनीच खायच्या.
 
मात्र, धनदांडग्यांना रेड कार्पेट टाकून कायदे मोडायला लावायचे? लोकशाहीचा गाडा हाकताना चारही स्तंभ मजबूत असले पाहिजेत. तर आणि तरच हा देश टिकू शकतो. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारे केवळ पैशाच्या लालसेपोटी गाढवासारखे वागतात. महाबळेश्वर येथे दीड वर्षापूर्वी घडलेल्या हेलिकॉप्टर लॅण्डिंग तसेच टेक ऑफ प्रकरणात अनेकांनी मुळासकट हाणले. त्याला तत्कालीन जिल्हाधिकारी व आयजीही अपवाद नव्हते. कदाचित त्यावेळीच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असतानासुद्धा डीएचएफएलच्या वाधवानसह रिलायन्सच्या अनिल अंबानींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता तर परवा वाधवानने टाळेबंदी असताना महाबळेश्वरात घुसण्याचा विचारही केला नसता. त्यामुळे काही गोष्टी वेळेत झाल्या नाहीत तर कशापद्धतीने विस्फोट होवू शकतो, त्याची किंमत कशा पद्धतीने मोजावी लागते, हे वाधवान प्रकरणाने समोर आलेले आहे. परंतु सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी वाधवान प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर डॅशिंग आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे. मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार केल्याने नांगरे - पाटलांची महाबळेश्वर प्रकरणात नक्कीच काहीतरी भानगड असणार. त्यामुळे वाधवान व अंबानीला वाचविण्यासाठी खरं बोला विश्वासराव, सांगा वाधवानने किती दिले? असा प्रश्न तमाम सातारकर करीत आहेत.