तुळजाभवानी मंदिर आणि 'झेडपी'चा मदतीसाठी पुढाकार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

12 Apr 2020 23:04:46

* जिल्ह्यातील १५ हजार गरजू कुटुंबासाठी जीवनाश्यक वस्तूंच्या संचांचे होणार वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या अभूतपूर्व संकटातून सावरण्यासाठी आता तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून पाच हजार तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा हजार जीवनाश्यक वस्तूच्या संचाचे वाटप केले जाणार आहे. हातावर पोट असणारे मजूर, निराधार आणि गोरगरिबांना तुळजाभवानी मंदिर आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा आधार मिळणार आहे. तेल, मीठ, तांदूळ, गहू, साखर, डाळ आशा जीवनाश्यक वस्तूंच्या १५ हजार संचाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Ranajagjitsinh Patil_1&nb
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली असून शेतमाल विकला जात नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. शहरातील बांधकाम व इतर छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी मजुरांचे देखील हाल होत आहेत. अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थांन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरजूंना १५ हजार जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ यासारख्या जिवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व नागरिक देखील गरजूंना अन्नधान्य वाटप करत आहेत, तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंकरराव गडाख साहेब यांनी श्री. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात ५००० जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या संच वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे. मंदिर समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंढे यांच्या मान्यतेने आवश्यक साहित्याची खरेदी प्रक्रिया सध्या सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण जनतेला गरजूंना दिलासा देणे अत्यंत निकडीचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंचे १०००० संच वाटप करण्याबाबत जि.प. अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्याशी चर्चा झाली असून याबाबत तातडीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. अरविंद कुमार यांना देखील याबाबत अवगत करण्यात आले आहे.
यातून जिल्ह्यातील गोर-गरीब आणि गरजू १५ हजार कुटुंबांसाठी जीवनाश्यक वस्तूंचे संच उपलब्ध होणार आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे ५ हजार संच नागरी भागासाठी तर जिल्हा परिषदेचे १० हजार संच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचे नियोजित आहे. ग्रामीण भागात कोरोना सहाय्यता कक्ष व नागरी भागात तत्सम यंत्रणेचे याकामी सहकार्य घेतले जाईल. संबंधित यंत्रणांनी योग्य ते निकष लावून गरजू नागरिकांपर्यंत जलद गतीने मदत पोहोंचविण्यासाठी काटेकोर नियोजन करावे असे आवाहनही आमदर राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0