कोरोनाच्या निमित्याने सर्वांसाठी....साद माणुसकीची, समग्र ग्रामविकासाची

हरीश बुटले    01-Apr-2020
Total Views |
आपण सर्व आज जीवनाच्या अश्या वळणावर आहोत की उद्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याची कल्पना करताना इतर देशात विशेषतः अमेरीका, युरोपमध्ये सध्या जे काही घडत आहे त्याच्यावरून काळजाचे ठोके चुकावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र करोनाच्या या महाभयंकर विळख्यातून सहीसलामत सुटल्यावर आपणास प्रतिबंधात्मक ( Preventive) अशी जर सर्वात महत्वाची कोणती गोष्ट करावी लागेल तर ती आहे समग्र ग्रामविकास. ज्यामुळे महानगरे आणि शहरांचा बोजा न वाढू देत चंगळवादी संस्कृतीला यावर घालत आपण पर्यावरणाला (Ecosystem) हानी न पोहचवता जगू शकू आणि अचानक उद्भवणाऱ्या अश्या संकटांना निमंत्रण देणे बंद करू. आयुष्यात प्रथमच संपूर्ण भारत आपापल्या प्रियजनांसोबत घरात थांबून अनेक बाबतीत निरनिराळे वास्तवाचे धडे गिरवत असताना बघतो आहे. थेट भासवत नसले तरी सर्वजण प्रचंड अश्या भीतीखाली वावरत आहे. एक दिवस सर्वांनी मिळून एकत्रितपणे कृती केली तर खरंच काय फरक पडतो बरं ? 'जनता कर्फ्यु' च्या एका दिवसाने आणि आता सुरू असलेल्या २१ दिवसाच्या लॉकडाऊन मुळे मनुष्याला खूप मोठा कानमंत्र दिला आहे, तो म्हणजे सर्वांनी मिळून ठरवलं तर अशक्य असे काहीच नाही.
 
Corona11_1  H x
 
आपण बघतोच आहोत की चीनच्या वूहानपासून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग अमेरिका, युरोपात थैमान घालून दुबईमार्गे भारतात पोहोचला. जगातील १७५ देश आता या भयानक संकटाचा सामना करत आहेत. कोणतीही परदेशातून येणारी साथ पसरायची असेल तर ती आधी प्रमुख महानगरातूनच पसरणार. याचे कारण म्हणजे कामानिमित्त आणि पर्यटनासाठी जाणारे बहुसंख्य उच्चभ्रू याच महानगरात स्थायिक झाले असतात. त्यापैकी अनेकजण मुळात कोणत्या ना कोणत्या खेड्यातून शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्याने महानगरात आलेले आहेत. गावखेड्यातून येऊन महानगरात आले, समृद्ध झाले मात्र त्यांनी आपल्या समृद्धीचा वापर आपल्या मूळ गावासाठी क्वचितच केला. अश्या अनेकांनी आपल्या मूळ गावी धाव घेतली आहे. कारण गावं अजूनही या प्रदूर्भावापासून दूर आहेत आणि सहवासात आल्याशिवाय हा संसर्ग होऊ शकणार नसल्याने गावाकडे तुलनेने धोका कमी आहे.
 
म्हणजे आपल्यावर कठीण प्रसंग ओढवल्यावर या अनिवासी ग्रामवासीनी आपआपल्या गावाकडे धाव घेतली आहे. आपल्या जीवाला धोका पत्करून त्या सर्वांची माणुसकीने तपासणी करून गावाने प्रवेशही दिला आहे. आता या सर्व अनिवासी ग्रामवासींना एक प्रकारे आपण आपल्या गावासाठी फार काही करू शकलो नाही याची नक्कीच खंत वाटत असेल आणि हीच वेळ आहे त्या सर्वांना आपल्या गावासाठी काही करण्याची आणि गावकऱ्यांनीही त्यांच्याकडून काही करून घेण्याची.
शहरात स्थायिक झालेला आणि गावाविषयी प्रेम असणारा माणूस गावाकडे भरणाऱ्या सप्ताह, उरूस, जत्रा, लग्न, बारशी आणि मयतीसाठी प्रसंगानुरूप येत असतो कारण त्याची नाळ त्या गावात पुरलेली असते. मात्र या दरम्यान तो गावाच्या देवळासाठी किंवा फारतर सप्ताहासाठी थोडंफार योगदान देत असतो. मात्र गावाच्या शेती, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, कौशल्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक समस्या, जनजागरणासाठी फारसा उत्सुक नसतो. एखादा दुसरा पुढे येत असला तरी गावातील बारा भानगडीमुळे त्याला त्यात फारसा रस उरत नाही.
 
स्वातंत्र्य मिळून आता ७३ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे तरी खेडी समृद्ध होण्याऐवजी ती उलट ओस पडली आहे आणि शहरं अतिप्रचंड फुगल्यामुळे बकाल झालेली आहेत. गावात राहायला आता म्हातारी माणसं आहेत आणि जे तरुण आहेत त्यांच्या हाताला कौशल्य नाही आणि पर्यायाने काम नाही. थोडेबहुत जे शिकलेले आहेत त्यांना शेती करायला कमीपणा वाटतो आहे आणि त्यांचा रिकामा वेळ दीड जिबी डाटा संपवण्यात वाया जात आहे. अश्या स्थितीत गावाकडील पायाभूत सुविधा आणि उपजीविकेचे साधनं वाढली नाहीत तर शहारांवरचा ताण आणखी वाढेल आणि आणखी कोणत्यातरी नव्या मानवनिर्मित आपत्तीला सामोरं जावं लागेल.
 
चांगली उपजीविका आणि जीवनमानाचा दर्जा शहरातच मिळणार आहे असे चुकीचे गृहीतक झाल्याने व त्याला पोषक असे सरकारी धोरण असल्याने तरुणांचा शहराकडे लोंढा वाढतो आहे. निवृत्तीनंतर अनिवासीं ग्रामवासींना आपल्या गावाची ओढ असते, त्यांना उर्वरित आयुष्य गावी जाऊन राहवेसे वाटते मात्र सोयीसुविधांचा अभावी तसेच मूलं शहरात किंवा परदेशात राहत असल्याने ते देखील आपल्या गावी जाण्याच्या ऐवजी शहरातच राहणे पसंद करतात. शहरात ज्यांची कामं संपलेली आहे अश्या अनिवासी ग्रामवासी निवृत्त लोकांना आपापल्या गावात परतण्यासाठी ( रिव्हर्स मायग्रेशन) गावाकडील सोयीसुविधांकडे लक्ष देणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. अनिवासींचा शहरांवरचा हा ताण कमी झाल्यानंतरच उपजीविकेसाठी गावातील काही तरुणांना शहराची वाट धरता येईल. तोपर्यंत सध्या केवळ 'वन वे' ट्रॅफिक झाले आहे. त्यामुळेच भविष्यात वाढून ठेवलेल्या सर्व समस्यांचे ते मूळ आहे आणि म्हणूनच समग्र ग्रामविकास होणे ही काळाची गरज आहे.
 
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरकार योजना आखत नाही असे नाही, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यासाठी राजकारणी व नोकरशाहीच्या वरदहस्ताने आणि जनजागरणाचे अभावी अनेक योजना गावापर्यंत पोहचेपर्यंत मध्यस्तच त्याचा कागदोपत्री लाभ घेतात हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र अश्याही स्थितीत काही ठिकाणी चांगले काम होत आहे तिथे त्याचे दृश्य परिणाम दिसत आहे मात्र त्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. आमच्या साद माणुसकीची फाऊंडेशन तर्फे मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी या माझ्या मूळ गावापासून सादग्राम निर्मिती प्रशिक्षणाला सुरुवात करून मराठवाडा आणि विदर्भातील ३-३ गावात काम केले. तेथील चांगल्या-वाईट अनुभवांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ९ गावात आम्ही प्रयोग सुरू केला आहे. अल्पावधीतच त्याला ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या भक्कम पाठिंब्याने खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
अश्या स्थितीत ग्रामविकासाच्या संबंधित सर्व घटकांना एकत्रित साद घालून त्यांच्या प्रतिसादातून गावांचा विकास साधण्याची प्रकिया म्हणजे 'सादग्राम' निर्मिती. अर्थातच ही प्रक्रिया जेवढी समजायला सोप्पी तेवढीच तिची अंमलबजावणी कठीण आहे. म्हणूनच खरे तर एवढे वर्ष ग्रामविकास रखडलेला आहे. मात्र संबंधित सर्व घटकांनी एकत्रित विचार करून ठरविले तर ग्रामविकास अगदी सहज होऊ शकतो. सादग्राम निर्मिती प्रक्रियेतून आम्ही तेच मांडतो आणि गावांकडून करून घेत आहोत. समग्र आणि शाश्वत ग्रामविकास झाला नाही तर महानगरांपासून शहरापर्यंत सर्वांच्याच मुळावर येईल ते काही वेगळे सांगण्याची गरज नाही.
 
सर्वांनी मिळून मनावर घेतले आणि एकजूट दाखविली की आज ज्याप्रमाणे कोरोनाच्या भीतीने संपूर्ण भारताने एकजूट दाखवत जनता कर्फ्यु यशस्वी केला तसाच ग्रामविकास मनावर घेतला आणि गावांचे सक्षमीकरण करण्याचे धाडस दाखवले तरच आपण भविष्यात आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या समस्यांचा सक्षमपणे सामना करू शकू. करोनाच्या सद्यपरिस्थितीत शक्यतो गावात जास्त जण एकत्र जमू नये. महानगरातून आलेल्या आपल्या प्रियजनांपासून आलेल्या दिवसानंतर साधारणपणे १४ दिवस शक्यतो सुरक्षित अंतर ठेऊन त्यांच्याशी नित्याचे व्यवहार करावे. चला तर मग आपण सर्वच मिळून करोनाच्या या संकटाचा संधी म्हणून वापर करू या आणि आपल्या गावात आलेल्या सर्व अनिवासी ग्रामवासींना आपल्या गावाच्या समस्यांची माहिती करून देऊ या आणि आपल्या गावाच्या विकासात त्यांचे महत्वाचे योगदान घेऊ या.
 
ज्यांना आपल्या गावाला सादग्रामच्या वाटेवर न्यायचे आहे त्यांनी आम्हाला संपर्क करावा. त्या-त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान एक गाव या प्रक्रियेत सामील व्हायला आले की त्या जिल्ह्याचा सादग्राम निर्मितीसाठी विचार करण्यात येईल. सादग्राम निर्मिती म्हणजे काय ते मोजक्या शब्दात लक्षात घेऊ.ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामविकास मंडळाचे सदस्य, अनिवासी ग्रामवासी, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, विषयतज्ज्ञ मार्गदर्शक, हितचिंतक, दाते यांना एकत्रित साद घालून त्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादातून सामाजिक दायित्व निधी (CSR) , देणग्या, लोकवर्गणी व प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने समर्पक जागरण करून व्यापक लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर आधारित, 'एक गाव बारा उपक्रम' राबवून सर्वांगीण वाटचाल करीत प्रशासनाच्या माध्यमातून सर्व घटकांच्या सहयोग आणि सहकार्याने सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत गावाचा समग्र आणि शाश्वत विकास करण्याची प्रकिया म्हणजेच सादग्राम निर्मिती.
आशा रीतीने प्रत्येक समृद्ध झालेल्या माणसाने आपले मूळ गाव आणि ज्यांची मूळ खेडी नाहीत अशा सर्वांनी आपल्या आवडीचे एखादे खेडे निवडून त्यासाठी योगदान द्यावे त्याचवेळी आपण समग्र ग्रामविकास साधू शकू आणि भविष्यात येणाऱ्या अनेक संकटांपासून स्वतःचा आणि येणाऱ्या पिढ्यांचा बचाव करू शकू.
आम्ही आपणास 'साद' दिलेली आहे
आता आपल्या 'प्रतिसादाच्या' अपेक्षेत !
सादग्राम जिंदाबाद !
माणसा माणसा जागा हो
माणुसकीचा धागा हो !