फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

05 Mar 2020 18:38:48
मुंबई : अर्थसंकल्प मांडणे हे जसे क्लिष्ट काम आहे तसाच तो समजून घेणे आणि समजावून सांगणे हे देखील अतिशय क्लिष्ट काम आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगणारे, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्याचे मत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
artha sankalpa book _1&nb
 
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, अर्थसंकल्पात आर्थिक नियोजन मांडले जाते तो पैसा सर्वसामान्य नागरिकांचा असतो आणि त्याचे नियोजन कसे केले गेल हे त्याला कळलेच पाहिजे त्यामुळे अर्थसंकल्पाची भाषा ही सोपीच असावी. तथापि, काही अर्थसंकल्पीय परिभाषांना पर्याय नसतो, त्या परिभाषा या पुस्तकातून समजतील, असा विश्वास श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. योग्य पुस्तक, योग्य वेळी वाचकांच्या हाती पडत असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
 
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. कार्यक्रमाचे संचालन विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी केले तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आभारप्रदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0