महाआघाडी सरकार कोसळण्याची नारायण राणेंची भविष्यवाणी ठरली खोटी

जनदूत टिम    05-Mar-2020
Total Views |
भिवंडी : महाआघाडी सरकार अकरा दिवसात कोसळणार असल्याची राजकिय भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी भिवंडीत अकरा दिवसांपूर्वी केली होती. मात्र या भविष्यवाणीच्या अकरा दिवसात महाआघाडीत कोणतीही बिघाडी झाली नसल्याने खा. नारायण राणेंनी केलेली हि भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे. भिवंडीत श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब व खासदार कपिल पाटील फाऊंडेशन यांनी खासदार पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अंजूर येथे आयोजित केलेल्या खासदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खा. नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न झाले होते .
 
narayan-rane_1  
 
या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनासाठी अकरा दिवसांपूर्वी राणे भिवंडीत आले होते. या क्रिकेट सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री म्हणून मी आलो आहे तर या सामन्यांच्या समारोपाला ११ दिवसांचा कालावधी असल्याने स्पर्धेच्या समारोपाला नक्कीच भाजपाचा मुख्यमंत्री येईल, असा आशावाददेखील खासदार नारायण राणे यांनी व्यक्त करत महाआघाडीचे सरकार आज पडेल की उद्या पडेल , हे सांगता येत नाही ते कधीही कोसळू शकते, असे मत देखील राणे यांनी याप्रसंगी व्यक्त केले होते. गुरुवारी या क्रिकेट सामन्यांचा शेवटचा दिवस असून राणेंनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीचा देखील अकरावा दिवस आहे. मात्र त्यांच्या भविष्यवाणीचा महाआघाडी सरकारवर काहीच परिणाम झाला नसल्याने राणेंची हि भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली आहे.