आर्थिक पाहणी अहवाल : गेल्या वर्षात महाराष्ट्रात दीड लाख नोकऱ्या झाल्या कमी

05 Mar 2020 17:41:46
मुंबई : आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१९-२० या वर्षांत दीड लाख रोजगार कमी झाले आहेत.
आज विधानसभेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. २०१८-१९ या वर्षी राज्यात ७३ लाख ५० हजार रोजगार उपलब्ध होते, तर २०१९-२० या वर्षी राज्यातील रोजगारात घट होऊन तो ७२ लाख ३ हजारांवर आला आहे. म्हणजेच राज्यातील रोजगारात १ लाख ४७ हजारांची घट झाली आहे. याशिवाय राज्याचा बेरोजगारीचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचा बेरोजगारी दर ८.३ टक्के असून कर्नाटकचा ४.३ टक्के, गुजरातचा ४.१ टक्के, पश्चिम बंगालचा ७.४ टक्के आणि पंजाबचा ७.६ टक्के इतका असून या आकड़ेवारीवरुन महाराष्ट्राचा बेरोजगारीचा दर सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे.

Job_1  H x W: 0 
आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार राज्यात महिला अत्याचारात झाली वाढ आहे. वर्ष २०१८ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ३५,४९७ घटना घडल्या होत्या. तर २०१९ मध्ये हे प्रमाण वाढून ३७,५६७ पर्यंत पोहोचले आहे. वर्ष २०१८ मध्ये बलात्काराचे ४९७४ गुन्हे नोंदविण्यात आले होते त्यात वाढ होऊन २०१९ मध्ये ५४१२ पर्यंत पोहोचले आहे. महिलांचे अपहरण आणि पळवून नेणे यात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये ६८२५ गुन्ह्यांची नोंद झाली होती ती वाढून २०१९ मध्ये ८३८२ इतकी झाली आहे. यामध्ये हुंडाबळीचं प्रमाण मात्र कमी झालं. २०१८ मध्ये २०० आणि २०१९ मध्ये १८७ घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0