पत्रीपूल भाजपतर्फे शिवसेनेबरोबर पालक मंत्र्यांविरोधात धरणे आंदोलन

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

पत्रीपूल भाजपतर्फे शिवसेनेबरोबर
पालक मंत्र्यांविरोधात धरणे आंदोलन

जनदूत टीम
कल्याण : पत्रीपुलाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी देण्यात आलेली फेब्रुवारी 2020 ही तारीख उलटली असून अद्यापही या कामाला विलंब होत असल्याचे सांगत भाजपतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेबरोबरच पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 
patri pool_1  H
 
कल्याणकरांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या पत्रीपुलाचे काम गेल्या दिड वर्षांपासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने होत असून त्याला होणाऱ्या विलंबामुळे आज हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून पत्रीपुलाच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना पेपरला जायला उशिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु जाणीवपूर्वक या पुलाच्या कामाला विलंब लावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला. तसेच या पुलाच्या कामाचे श्रेय आपल्याला मिळू नये यासाठी इथल्या नागरिकांना नाहक त्रासात ढकलण्यात आल्याचेही पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पत्रीपुल ही सर्वात मोठी समस्या असून त्याविरोधात आज हे धरणे आंदोलन सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तसेच दहावीची परीक्षा सुरू असल्याने आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असून वेळ पडल्यास नागरिकांच्या साथीने आम्ही रस्त्यावरही उतरण्याचा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला. दरम्यान यावेळी शिवसेना, राज्य सरकार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर, मनोज राय, रमाकांत पाटील, सचिन खेमा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी शिवाजी आव्हाड यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.