काळू नदीपूल धोकादायक

04 Mar 2020 15:18:44

काळू नदीपूल धोकादायक

जनदूत टिम
किन्हवली : शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि शहापूर-मुरबाड या दोन तालुक्यांना 'जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे संगमेश्वरचा काळू नदीवरील पूल. सध्या ५७ वर्षे आयुर्मान असलेला हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. त्यातच या पुलाचे अजूनपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नसून देखभाल दुरुस्तीसाठी काय खर्च झाला, याची माहिती निरंक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात वाहनाने या पुलाच्या कठड्याला जोरात धडक दिल्याने पुलाची हानी झाली असून पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
 
kinhavali nadi pool_1&nbs
तत्कालीन मुख्यमंत्री एम. एस. कन्नमवार यांच्या हस्ते १० जून १९६३ ला पुलाचे उद्घाटन झाले होते. तत्पूर्वी ७ एप्रिल १९६० मध्ये पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली व पुलाचे काम ३१ मे १९६३ मध्ये पूर्ण झाले. या पुलाची नदीपात्रापासून उंची ४५ फूट तर लांबी ५५२ फूट आहे. या पुलाला ६० फुटांच्या ८ कमानी असून रस्त्याची रुंदी २२ फूट आहे. पुलाच्या बांधकामाचा एकूण खर्च ५ लाख ५० हजार इतका झाला होता. दोन वर्षांपासून शहापूर-लेनाड-मुरबाड मार्गावरील काळून नदीवरील पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने शहापूरकिन्हवली-सरळगाव या मार्गावरून वाहतूक वाढली आहे.
 
सध्या शेणवे-किन्हवली सरळगाव या रस्त्याचे अन्युईटी हायब्रीड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असले तरी काळू नदीवरील संगमेश्वर पुलाची डागडुजी मात्र होताना दिसत नाही. पुलाचे कठडे कमकुवत झाले असून मध्येच पिंपळ, वड यासारखी झाडे रुजली असून त्यांची मुळे घट्ट रोवली आहेत. सध्या पुलावरून वाहतूक करताना प्रवाशांना व वाहन चालकांना धडकी भरते. त्यामुळे या पुलाचे नूतनीकरण करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0