तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग

जनदूत टिम    04-Mar-2020
Total Views |

तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग

सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करताना तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक हिलच्या डोंगरातून काढण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचा अंतिम आराखडा सरकारने नेमलेल्या सल्लागाराने तयार केला असून तो सरकारच्या पायाभूत समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (विशेष उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली. हा भुयारी मार्ग तयार झाल्यावर तुर्भे येथे वाहतूककोंडी न होता ही वाहतूक थेट खारघर येथे बाहेर पडेल. परिणामी, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
 
सायन-पनवेल मार्गावर जा-ये करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कल्याण व पुढे कळंबोली, जेएनपीटी, पुणे, कोकण, कर्नाटक व गोवा अशा भागांत जाणारी वाहतूक याच मार्गाने होत असते. ज्या महामार्गावरून ताशी ७० किमी.ने वाहने धावणे अपेक्षित आहे, त्या रस्त्यावर वाहतूककोंडीमुळे ताशी ४० ते ५०किमी. च्या गतीने वाहने धावत आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूककोंडी उद्भवत आहे. भविष्यात वाशी खाडीपुलावर चौथा पूल बांधणे प्रस्तावित आहे. तो बांधून पूर्ण झाल्यावर तर सायन-पनवेल मार्गावर वाहतूककोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता तुर्भे ते खारघर हा भुयारी मार्ग तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच, खारघर येथे बीकेसीच्या धर्तीवर सिडको वाणिज्यिक केंद्र उभारणार असल्याने सिडको महामंडळदेखील या भुयारी मार्गासाठी आर्थिक हातभार लावणार आहे.
 
१२ एप्रिल २०१९ रोजी सरकारने घेतलेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या सल्लागारांनी दिलेल्या बांधकाम आराखड्यांपैकी एक आराखडा निश्चित करण्यात आला असून अंतिम मंजुरीसाठी तो सरकारच्या पायाभूत समितीच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.
 
सिडको, एमआयडीसी व एमएसआरडीसीचा सहभाग
एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि सिडकोच्या आर्थिक सहभागातून तुर्भे ते खारघर हा भुयारी मार्गाचा प्रकल्प साकारला जाणार असून उर्वरित रक्कम कर्जरूपाने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्प उभारणीत सिडको ३०० कोटी, एमआयडीसी १५० कोटी आणि एमएसआरडीसी १५० कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे. उर्वरित ६२२ कोटी रुपये शासन कर्जरूपाने उभारणार आहे. एकूण १२२२ कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च होणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.