अखेर त्या नराधमाना फाशी!

जनदूत टिम    22-Mar-2020
Total Views |
दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ रोजी २३ वर्षे वयाच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि अमानुष अत्याचाराच्या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. ज्या पीडित मुलीवर क्रूर अत्याचार करण्यात आले होते तिचा २६ डिसेंबर २०१२ रोजी उपचारादरम्यान सिंगापूर येथील इस्पितळात मृत्यू झाला. ‘निर्भया’ नावाने ओळखली गेलेली ही तरुणी, तिचा काहीही गुन्हा नसताना, ज्या कामांध तरुणांच्या अत्याचारास बळी पडली ते मात्र हा गुन्हा घडल्यानंतर आणि तो सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आल्यानंतरही शिक्षा लांबणीवर टाकण्याची केविलवाणी धडपड करीत होते. अखेर २० मार्च २०२० या दिवशी पहाटे या गुन्ह्यात सहभाग असलेल्या चौघा जणांना फाशी देण्यात आली.
 
Nirbhaya_1  H x
 
या गुन्हेगारांनी कायद्याच्या पळवाटा शोधून आपली फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला पण ते सर्व प्रयत्न फसले आणि अखेर त्यांना फाशी झाली. गुन्हेगारांना मृत्युदंड देण्यास खूप विलंब झाल्याने या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या निर्भयास न्याय कधी मिळणार, अशा शंका सर्वांच्या मनात उपस्थित होत होत्या. पण त्या सर्वांवर आता पडदा पडला आहे. या गुन्ह्यातील मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या चौघांना तिहार कारागृहात पहाटे साडे पाच वाजता फासावर लटकविण्यात आले. या चौघांना फाशी दिल्याने निर्भयाच्या आत्म्यास शांती मिळेल की नाही हे माहित नाही पण अशा नृशंस, माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा करणार्‍यांना मृत्युदंडाची शिक्षा टाळता येत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे.
 
दिल्लीतील निर्भया प्रकरणात गुन्हा सिद्ध झालेल्या नराधमांना फाशी देण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन, काही काळापूर्वी हैदराबाद पोलिसांनी एका तरुणीवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगारांना कायदा हातात घेऊन गोळ्या घालण्याची जी कृती केली तीच योग्य असल्याचे मत सर्वसामान्यांनी व्यक्त केले होते. उशिराने न्याय मिळणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच असते, असे म्हटले जाते. निर्भया प्रकरणावरून तसे दिसून आले. पण या शिक्षेसंदर्भात दाद मागण्याची सर्व संधी त्या नराधमांना देण्यात आली. पण त्यांची बाजू कोठेही टिकली नाही. प्रदीर्घ काळ शिक्षा लांबणीवर पडलेल्या गुन्हेगारांना अखेर फाशी झाली! या खटल्यातील अन्य दोन गुन्हेगारांपैकी अल्पवयीन असलेल्या गुन्हेगाराविरुद्ध जुवेनाईल जस्टीस बोर्डापुढे खटला चालविण्यात आला. त्या गुन्हेगारास कमाल तीन वर्षे रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. त्याची २०१५ मध्ये सुटका करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी राम सिंह याने ११ मार्च २०१३ या दिवशी तिहार कारागृहामध्ये आत्महत्या केली.
 
निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांची फाशी लांबणीवर पडत असल्याचे पाहून निर्भयाच्या आईची उद्विग्नता वाढत चालली होती. ‘हमारी खुशीयां तो हमेशा के लिए छीन गयी है, जिंदगी भर की सजा है’, या निर्भयाच्या मातेच्या वक्तव्यावरून त्या मातेस कोणत्या परिस्थितीतून जावे लागले आणि जावे लागणार आहे याची कल्पना येते. अखेर त्यांना फाशी देण्यात आली. हा प्रदीर्घ लढा होता, अखेर आम्हास आज न्याय मिळाला. हा दिवस देशातील सर्व मुलींसाठी अर्पण करीत आहे’, असे निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे आखून द्यावीत म्हणजे भविष्यात कोणी अशा प्रकारच्या प्रकरणांना लांबणीवर टाकण्याचे डावपेच खेळणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचाही गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.
 
या प्रकरणातील चौघा जणांना अखेर मृत्युदंड झाला. आपल्या देशात या आधी २०१५ साली मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार याकूब मेमन यास फाशी देण्यात आली होती. त्यानंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली ही पहिलीच घटना. निर्भया प्रकरणानंतरही देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेतच. असे गुन्हे करणार्‍या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा आणि तीही तातडीने दिली गेल्यास अशा गुन्ह्यांना आणि ते करणार्‍यांना जरब बसू शकेल. असे गुन्हे करणार्‍यांना त्वरित शासन व्हावे म्हणून जलदगती न्यायालये स्थापण्यात आली. पण विविध पळवाटा शोधून गुन्हेगार आपली शिक्षा कशी पुढे ढकलू शकतात, हे या प्रकरणावरून दिसून आले आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचारांसंदर्भातील खटले त्वरित निकालात काढून गुन्हेगारांना त्वरित शासन झाल्यास अशा अपराधांना पायबंद बसू शकेल.