पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला ग्रामीण जनतेचा प्रतिसाद

20 Mar 2020 18:44:15
वाडा : जगभरात फैलाव झालेल्या कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी (दि. २२ मार्च) देशात जनता कर्फ्यु राखण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेचाही प्रतिसाद लाभत असून उत्तरकार्यासारखे विधीमध्येसुद्धा आता फेरबदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

Wada_1  H x W:
 
वाड्यातील गांधरे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे निवृत्त सचिव असणारे भगवान नामदेव ठाकरे यांचे १० मार्चला निधन झाले असून प्रथेप्रमाणे त्यांचा उत्तरकार्य विधी तेराव्या दिवशी म्हणजे रविवारी (२२ मार्च) आयोजित केला होता. मात्र पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाकरे कुटूंबियांनी तेराव्याचा उत्तरकार्य विधी आदल्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी शनिवारी (२१ मार्चला) करण्याचे ठरविले आहे.
 
कोरोनाचा वाढलेल्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यु जाहीर केला असून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे जनतेला आवाहन केले आहे. या आवाहनाला आता ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0