शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार

जनदूत टिम    02-Mar-2020
Total Views |
-

शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार

- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
 
मुंबई : राज्यशासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुकास्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचे विचाराधिन असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले.

shivbhoajan thali_1 
विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, सहकार, वस्त्रोद्योग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना भुजबळ बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवभोजन ही प्रायोगिक तत्वावरील योजना असून टप्प्याटप्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून थाळींची संख्या देखील वाढवली आहे.
उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांकडे सिलेंडर आहे मात्र ते सिलेंडर पुन्हा भरण्याची त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसल्याने सिलेंडर विनावापर पडून आहे. अशा लोकांना शिधापत्रिकेवर केरोसिन देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेवून मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल असे श्री.भुजबळ यांनी सांगितले.