सारी भगवंताची करणी - कोरोना!

जनदूत टिम    18-Mar-2020
Total Views |
ज्याच्या नामस्मरणाने मनातील भीती, अस्थिरता नष्ट होते, मन धीट होते, उत्साही होते, ज्याच्या मर्जी शिवाय वाऱ्याची झुळूक येत नाही,झाडाचे पान हलत नाही,अथांग समुद्रात लाटा निर्माण होत नाहीत असा दृढ विश्वास असलेली अदृश्य शक्ती म्हणजे भगवंत!
वैज्ञानिक पार्श्वभूमी असलेल्या घटना जरी घडत असल्या तरी त्यामागे भगवंताची करणी असेच जे बोलले जाते त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. ही सृष्टी ज्याने निर्माण केली, ती टिकवायची कशी? सुंदर बनवायची कशी? निसर्गाचा समतोल ठेवायचा कसा? किंवा ती नष्ट करायची कशी? हे सर्व विधात्याच्या म्हणजेच भगवंताच्या हातात. हजारो वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या ह्या सृष्टी मध्ये भगवंताने एक हुशार प्राणी जन्माला घातला , तो म्हणजे सुपीक मेंदू असलेला माणूस! नग्नावस्थेत जन्माला आलेल्या मनुष्यप्राण्याने ही सृष्टी एवढी सुंदर बनवली, एवढी सुंदर बनवली की आता तिचा अतिरेक झाला असावा.
 
corona_1  H x W
 
विधात्यालाही ह्या हुशार मनुष्यप्राण्याने आव्हान दिले. कोणतेही गंभीर आजार किंवा हृदय, किडनी, डोळा अशा अवयवांत दोष निर्माण झाला की वैद्यकीय ज्ञान वापरून त्यावर इलाज करणे, अवयवच बदलून टाकणे, मुलगा की मुलगी इच्छेनुसार जन्माला घालणे एवढी प्रगती ही ह्या मनुष्यप्राण्याने केली. प्रगती करताना स्फोटके,प्लॅस्टिक, सिमेंट सारखे उत्पादन काढुन सिमेंट काँक्रीट चे रस्ते आणि इमारतींची जंगले उभी केली, नद्यांच्या स्रोतावर धरणं उभी करून पृथ्वीवर इच्छेनुसार अवाढव्य जलाशये केली, समुद्रात बोगदे काढून रेल्वे मार्ग काढले,तर हवेत विमान सोडून निरभ्र अवकाशात धुराचे लोट सोडले. ह्याचाच परिणाम म्हणून की काय, कधी अतिवृष्टीने ओला दुष्काळ, तर कधी विनावृष्टीने सुका दुष्काळ, कधी वादळं, कधी साथीचे रोग, तर कधी मानवनिर्मित बस,रेल्वे, जहाज, विमान अशा वाहनांचे अपघात इ कारणांने ह्या सृष्टि वरील सजीव प्राणी देवानेच कमी करून समतोल राखायची प्रक्रिया केली असावी असेच वाटते.
 
आर्थिक व्यवहारात स्वार्थ निर्माण झाल्याने माणसाने बलुतेदारी पद्धतीच नष्ट केली. माणसाने फक्त बलुतेदारीच नष्ट केली नाही तर स्वतः तील माणुसकीलाच तिलांजली दिली. नाती गोती, मैत्री, संस्कार सर्व विसरुन अनेक ठिकाणी कल्पना करू शकत नाही अशी गुन्हेगारी घडली. कोणाचीच भीती नाही अशा अविर्भावात वावरणाऱ्या माणसाने ह्या सर्वातुन सुधारावे, स्वतः वर काही बंधने घालावीत, निसर्गाचा समतोल राखावा म्हणूनच भगवंताने आताची परिस्थिती निर्माण केली असावी. कोरोना व्हायरस! अगदी पूर्ण विकसित अशा ब्रिटनच्या आरोग्यमंत्री पदी असलेल्या नदिन डॉरिस पासून ते सर्व सामान्य माणसा पर्यंत, श्रीमंतां पासून गरिबां पर्यंत कोणाचाही मुलाहिजा न बाळगता हा व्हायरस ज्याला लागण होईल त्याला देवाज्ञा देतोय. कोणालाही न घाबरणारा मनुष्यप्राणी ह्या कोरोना व्हायरस ने भयभीत झालाय. आर्थिक घडी विस्कटत असल्याने चिंतातूर झालाय. पण तरीसुद्धा दक्षता, स्वच्छता बाजूला ठेवून, जो पर्यंत आपल्याला त्याची लागण होत नाही तो पर्यंत त्याचे गांभीर्य न ठेवता सोशल मीडियावर त्याची टवाळकी करतोय. सर्व जबाबदारी सरकार आणि आरोग्यखात्यावर सोडून बेजबाबदार वागतोय. शेवटी अंगात मस्ती! दुसरे काय?
नागेश घुमरे, शहापूर