सक्तीची सुट्टी, वाचकांना पुस्तकांची आठवण नव्याने येऊ लागली

जनदूत टिम    17-Mar-2020
Total Views |
करोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. मालिकांचे चित्रीकरणही बंद झाले असून, शाळा-कॉलेजांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. नोकरदार घरून काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी वाचकांना पुस्तकांची आठवण नव्याने येऊ लागली आहे. ग्रंथालय बंद ठेवण्याचेही आदेश निघाले आहेत, मात्र ग्रंथालयांमध्ये पुस्तके मिळतील का, एखादे पुस्तक जास्तीचे मिळेल का, अशी विचारणा करणारे फोन येत आहेत.
 
Book_1  H x W:
 
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नायगाव शाखेचे कार्यवाह कृष्णा नाईक यांनी नायगाव शाखेमध्ये सध्या पुस्तकमोजणी सुरू असल्याने शाखा वाचकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय आधीच झाला होता, असे सांगितले. मात्र अनेक वाचकांनी फोन करून ग्रंथालय सुरू आहे का, याची चौकशी केली. नायगाव शाखेमध्ये विशेष विनंतीवरून काही सभासदांना दोनऐवजी तीन पुस्तकेही देण्यात आली आहेत. ग्रंथालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने वाचकांना वाचनानंद घेता यावा यासाठी हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. सध्या मध्यवर्तीचे संदर्भ ग्रंथालयही सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याचा अंदाज आहे.
 
वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचे कार्यवाह प्रमोद महाडिक यांनीही सरकारी आदेशांनुसार ग्रंथालय बंद ठेवल्याचे सांगितले. ग्रंथालयातील कर्मचारीवर्ग ग्रंथालयात उपस्थित आहे. मनोरंजनाचे पर्याय पूर्ण बंद झाले नसले तरी निर्बंध आल्याने नागरिकांना वाचायची इच्छा असल्याचे दिसत आहे. वाचकांकडून ग्रंथालयाबद्दल विचारणा करण्यात येत आहे. सोशल मीडियाचा वापर करून वाचकांपर्यंत सूचनाही पोहोचवण्यात आल्या आहेत. तरी एखादा वाचक ग्रंथालयाकडे पुस्तके मिळण्याच्या आशेने येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथालयामध्ये रविवारी तुलनेने जास्त गर्दी होती, अशी माहिती ग्रंथालयाच्या मुख्य ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांनी दिली, तर दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांनी ग्रंथमोजणीसाठी २३ मार्चपासून ग्रंथालय बंद राहणार असल्याने अनेक वाचकांनी जाडी पुस्तके नेऊन आपला वाचनाचा साठा आधीच तयार करून ठेवल्याचे स्पष्ट केले. याचा फायदा त्यांना करोनामुळे निर्माण झालेल्या सुट्टीसाठीही होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माहीम सार्वजनिक वाचनालयात प्रतिदिनी १५० ते २०० वाचक येतात. मात्र गेल्या १० दिवसांपासून या गर्दीत थोडी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहीम वाचनालय वाचकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र वाचक फोन करून वेळ जात नसल्याचे आवर्जून कळवत आहेत. अभ्यासिकाही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही करमत नसल्याची प्रतिक्रिया वाचनालयाकडे दिली जात आहे.
 
पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी घरोघरी दिली जाणारी सेवा खंडीत करणार नसल्याचे स्पष्ट केले. ही सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या ग्रंथालयाच्या डोंबिवली येथील टिळकनगर शाळेसमोरील शाखेमध्ये मात्र अनेक वाचक येत असल्याने तिथे प्रत्येक सभासदाला गर्दी टाळण्यासाठी तीन ते चार पुस्तके मंगळवारी नेता येतील, असे त्यांनी सांगितले. वाचकांना किमान या काळात वाचनाचा आनंद घेता यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याकडे या पार्श्वभूमीवर घरी पुस्तकसेवा घेणाऱ्यांनी नेहमीच्या पुस्तकसंख्येपेक्षा जास्त पुस्तके मिळतील का, अशीही विचारणा केली आहे.