कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य

जनदूत टिम    17-Mar-2020
Total Views |
ठाणे : राज्य शासनाचे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवणे, यास सर्वोच्च प्राधान्य आहे. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा यंत्रणेची आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. कोरोनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय कुमार, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, नगरपालिका मुख्याधिकारी, तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
Eknath Shinde_1 &nbs
 
पालकमंत्री म्हणाले, या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनातील सर्व घटकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार आपापली जबाबदारी पार पाडावी. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. आवश्यक तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात, वैद्यकीय साधन सामग्रीच्या मागणी व साठ्याबाबत आढावा घेण्यात यावा, वैद्यकीय विभागांना आवश्यक तेथे पोलीस विभागाने सहकार्य करावे. मास्क, सॅनिटायझर यांचा काळाबाजार होणार नाही, अशी दक्षता घ्यावी. सार्वजनिक स्वच्छतागृह याठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील, यांची दक्षता घ्यावी.
 
या कालावधीत लग्नसमारंभ व इतर समारंभाबाबत समुपदेशन करण्यात यावे. रहिवासी सोसायट्यांमध्ये नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी काय करावे, अथवा काय करू नये, याबाबत प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेत राजकीय पक्ष, सार्वजनिक संस्था, सार्वजनिक मंडळे, रोटरी क्लब, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग घेण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा द्यावी, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.