पुणे नको त्यापेक्षा गावकडं गेलेलं बरं!

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या १६ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस संसर्ग होणाऱ्यांची आणि संशयितांची संख्या वाढत असल्यानं पुणेकरांच्या काळजात धस्स होत आहे. विशेषतः करोनाविषयी पसरणाऱ्यांना अफवांनी यात भरच घातली आहे. शिक्षणापासून ते पुणेरी पाट्यापर्यंत. पुणे नेहमीच चर्चेत असतं. पण, यावेळी पुण्याकडं सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या करोना विषाणुमुळे. दुबईतून फिरून आलेल्या दाम्पत्यासोबत करोनाचे विषाणू महाराष्ट्रात आले आणि खळबळ उडाली.

Pune_1  H x W:
 
झपाट्यानं पसरणारा करोना आणि अफवांचं पिक यामुळे पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना काहीसं चिंतेनं घेरलं आहे. पण, या अफवांपासून सुटका मिळवण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी काही दिवस तरी पुणे नको रे बाबा म्हणत गावाकडचा रस्ता धरला आहे. पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर अनेकांनी गावी जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानक गर्दीनं गजबजून गेली आहे. पुण्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झालेलं आहे. अनेक तरुण-तरुणी शिक्षणानिमित्तानं पुण्यात वास्तव्यास असतात. त्यांनीही आता घराचा रस्ता धरल्याचं चित्र आहे. पुण्यासह पिंपरीच चिंचवड परिसरात मोठी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) आहे. एमआयडीसीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यासह अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील नोकरदारांची संख्याही लक्षणीय आहे. घरून काम करण्याची सुविधा मिळाल्यानं अनेक जण बाहेर पडण्याचं टाळत आहेत.
 
दखल घेण्यासारखी बाब म्हणजे या गर्दीच्या प्रवासात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिक पुरेशी काळजी घेताना दिसत आहे. संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विशेष प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वयंसेवी संस्था, संघटना व सजग नागरिक पुढाकार घेऊन जनजागृती करत आहेत. पुण्यातील मानाच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही भाविकांच्या आरोग्यासंदर्भात खबरदारी घेतली जात आहे. मंदिरात येणारे भाविक मास्कचा वापर करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायझरही ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत असल्याचं चित्र आहे. मेट्रोचं काम सुरू असल्यानं पुण्यात वाहतूक कोडीं होते. विशेष बाजारपेठांमध्ये मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांनी आता जनजागृती करायला सुरूवात केली आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी, देहूरोड व पुणे कटक मंडळ तसेच शहर हद्दीलगतच्या गावांमधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
 
आदेशापर्यंतच्या कालावधीत दहावी आणि बारावीसह इतर सर्व प्रकारच्या परीक्षा नियोजनाप्रमाणे सुरू राहतील, परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बाक रिकामा ठेवावा, एका बाकावर एकच विद्यार्थी असेल अशी व्यवस्था करावी, जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत त्यांच्या परीक्षेची व्यवस्था स्वतंत्र कक्षामध्ये करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापनामध्ये अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून ३१ मार्च २०२ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
 
पिंपरी-चिंचवड शहरात करोना व्हायरसची बाधा झालेला आज आणखी एक रुग्ण आढळला आहे. काल पाच रुग्ण आढळले होते त्यामुळे केवळ २४ तासांत पिंपरी-चिंचवडमध्ये सहा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रुग्ण जपान व दुबईवरून भारतात परतला होता. काल त्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या स्थितीस पिंपरी-चिंचवडमधील रूग्णांची संख्या ९ व पुणे शहारातील रूग्ण संख्या ७ आहे. दोन्ही मिळून पुण्यातील रुग्णांचा आकडा १६ झाला आहे. तर, संपूर्ण राज्यातील रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली आहे.