जेएनपीटीला परिवर्तनाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जाणार- मंडाविया

जनदूत टिम    16-Mar-2020
Total Views |
नवी मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे निर्माण करण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांचे उद्घाटन केंद्रीय नौकानयन (स्वतंत्र प्रभार) आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी केले. बंदरातील या सुविधांमुळे जेएनपीटी हे देशातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट म्हणून आपली स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज झाली असून हे सर्व प्रकल्प जेएनपीटीला परिवर्तनाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जाणार असल्याचे मंडाविया यांनी सांगितले.
 
JNPT_1  H x W:
 
जेएनपीटीच्या मोबाइल एक्स-रे कंटेनर स्कॅनर सुविधेमुळे टर्मिनल परिसरामध्ये जलदगतीने कंटेनर स्कॅन करण्यास मदत होणार असून कंटेनर बंदरामधून बाहेर पडण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणा योग्य ती कारवाई करू शकणार आहे. व्यापार-उदीमाला अधिक फायदा होणार आहे. नवीन मोबाइल कंटेनर स्कॅनरमुळे प्रति तास २० कंटेनर स्कॅन केले जाऊ शकणार आहेत. याशिवाय कंटेनर ट्रॅक्टर, ट्रेलर आणि कस्टम विभागाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन केंद्रिकृत पार्किंग फ्लाझा (सीपीपी) आणि इमारतींचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. या केंद्रीकृत पार्किंग प्लाझाचा विकास ट्रॅक्टर, ट्रेलर यांच्या एकत्रित पार्किंगसाठी केला आहे. या पार्किंग प्लाझामधील अत्याधुनिक सुविधा आणि सेवा तरतुदींमुळे कस्टम विभागाशी संबंधित दस्तावेज प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण केली जाऊ शकणार आहे. या प्रणालीमुळे जेएनपीटीच्या रस्त्यांवरील कंटेनर, ट्रकची वाहतूक सुलभ होईल आणि संबंधित टर्मिनसना त्यांच्या ट्रॅक्टर, ट्रेलर फेऱ्यांची योजना चांगल्या प्रकारे करण्यास मदत होणार असल्याचे मंडविया म्हणाले.
 
पोर्ट युजर इमारतीजवळ वाय जंक्शन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे अनावरण मनसुख मंडाविया यांच्या हस्ते करण्यात आले. या उड्डाणपुलाची लांबी ८३० मीटर आहे, तर दोन्ही बाजूंनी ६०० मी. लांबीचे मार्ग आहेत. नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलामुळे मालवाहतूक जलद होणार आहे. जेएनपीटीचे हे सर्व प्रकल्प जेएनपीटीच्या आयात-निर्यात व्यापारास मदत करण्यासाठी लॉजिस्टिक खर्च कमी करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मंडाविया म्हणाले.
 
शिवसमर्थ स्मारक व संग्रहालयाचे उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ उरणच्या जासई-दास्तान फाटा येथे उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ स्मारक व संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसमर्थ स्मारक हा एक मनोरंजन सुविधा प्रकल्प असून कला व संस्कृतीला चालना देण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानिक समाजासाठी ऐतिहासिक वारसा व संस्कृतीशी जोडणारे हे एक ठिकाण आहे. या प्रकल्पात कम्युनिटी हॉल, प्रदर्शनासाठी दोन हॉल, मॉडेल व पेंटिंगसाठी आर्ट गॅलरी, ऑडिओ व्हिज्युअल रूम, कॅफेटेरिया, २५० प्रेक्षकांची क्षमता असणारे अॅम्फीथिएटर, सात हजार चौरस मीटर लँडस्केप गार्डन आणि ग्रीन रूम अशा मनोरंजन सुविधांचा समावेश आहे. चौथ्या मजल्यावर दर्शकांसाठी डेक स्लॅब आहे. पाचव्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेता येणार आहे.