वसई विरार शहर करोनाच्या उंबरठ्यावर

जनदूत टिम    12-Mar-2020
Total Views |
वसई : जगभरात धुमाकूळ घालणारा करोना व्हायरस (novel covid 19) अगदी वसई विरार शहराच्या उंबरठ्यावर आला असून तो रोखण्यासाठी पालिका प्रशासन उदासिन असल्याचे दिसून येत आहे. ११ मार्च रोजी करोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ‘महामारी’ असे संबोधले आहे. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली आहेत. या व्हायरसला रोखण्यासाठी विविध सरकारी पातळीवर काम होणे गरजेचे असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ढिम्म आहेत. त्यामुळे नागरिकांना या करोना व्हायरसची लागण झाल्यावरच पालिकेला जाग येणार का, असा संतापजनक सवाल पर्यावरण कार्यकर्ते चरण भट यांनी केला. करोना व्हायरस (novel covid 19) हा श्वसानाचा आजार आहे. हा आजार माणसांच्या संपर्काद्वारे पसरतो. सध्या जगभरात साधारण ११४ देशांमध्ये ५४ हजार ७२६ करोनाग्रस्त आहेत. तर ४ हजार ७१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही ५८ लोकांना याची लागण झाली आहे. त्यातील १० रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आता तर मुंबईतही दोन रुग्णांना लागण झाली आहे. वसई- विरार शहर हे मुंबईच्या उबंरठ्यावर आहे.

corona_1  H x W
 
वसई तालुका हे पर्यटन, धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्र आहे. येथे दिवसाला साधारण १० लाखाहून अधिक पर्यटक, भक्त, नोकरदार वर्ग प्रवास करतो. तसेच तालुक्यातील ५ ते ६ लाख नागरिक मुंबई, ठाणे भागात नोकरीसाठी जातात. शहाराची लोकसंख्या २७ लाख. अशावेळी करोना व्हायरस (novel covid 19) पसरण्याची भिती जास्त असते. त्यामुळे याचा प्रादूर्भाव शहरात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र वसई विरार प्रशासन हे रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे.
 
हा संसर्गजन्य आजार सगळीकडे पसरू नये म्हणून महानगरपालिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने एप्रिल २०१६ मध्ये आपत्ती व्यवस्था योजना जारी केली होती. त्यानुसार महापालिकांनी गर्दीच्या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावणे, अधिकाधिक तपासणी केंद्रे उपलब्ध करून देणे, त्यासाठी लागणारी उपकरणे, यंत्रणांचे नियोजन केले करणे, डॉक्टर, परिचारिका, रोगनिदान तज्ज्ञ इत्यादींना प्रशिक्षण देणे, आरोग्य केंद्रामध्ये लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांसाठी निरिक्षण यंत्रणा उभारणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याची सोय करणे, जागोजागी स्वच्छतेची साधने ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, नाल्यांमध्ये औषध फवारणी कऱणे इत्यादी गरजेचे आहे. मात्र यापैकी कुठल्याच उपाययोजना पालिका करत असताना दिसून येत नाही. करोनाचा रुग्ण आढळला तर त्यांच्या उपचारासाठी आयसोलेशन वॉर्ड (विलगीकरण कक्ष) उभारणे आवश्यक आहे. परंतु पालिकेने तो देखील अद्याप तयार केलेला नाही. प्रशासन प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यास सपशेल अपय़शी ठरलेली आहे, असा आरोप पर्यावरण कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे.
 
वसई तालुक्यातील झोपडपट्टी परिसरात याची करोना व्हायरस (novel covid 19) बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. व्हायरसची लक्षणे आढळल्यास कोठे संपर्क करावा, कोणत्या आरोग्य केंद्रात जावे याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच त्यांना स्वच्छतेची साधने तसेच फेस मास्क उपलब्ध करून दिले पाहिजे. ही साधने आणि मार्गदर्शन प्रामुख्याने शासकीय कर्मचारी, परिवहन कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थांना दिले पाहिजेत. तर, करोना व्हायरस (novel covid 19) बाबतच्या समस्या सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला पाहिजे. मात्र पालिकेने ते केलेले दिसून येत नाही.
व्हायरस पसरू नये किंवा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन तसेच स्वच्छतेची साधने पुरवण्यासाठी खाजगी कंपन्या, कारखाने, खाजगी कार्यालये इत्यादींना सूचना दिल्या पाहिजेत. सामाजिक संघटनांच्या साहाय्याने रिक्षा संघटना, दुकानदार इत्यादींमध्ये जनजागृती केली पाहिजे. परिचारीका कायद्याप्रमाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णांलयांच्या अतिदक्षता विभागात प्रशिक्षित परिचारीका आहेत का, सर्व सुरक्षेची काळ1जी घेतली जात आहे का इत्यादींची पाहणी केली पाहिजे, परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे एकही पालिका डॉक्टर या आजारावर उपचार करण्यासाठी पात्र नाहीत. सध्या वसई-विरार महानगरपालिकेचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे त्यामुळे हे काम करण्याची सर्व जबाबदारी त्यांची आहे. याबाबत त्यांनाही निवेदन आणि तक्रारी पर्यावरण कार्यकर्ते चरण भट यांनी दिली आहे.
मात्र व्हायरस रोखण्यासाठी कोणतेही काम होताना दिसत नाही. सध्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू आहे. दुकानांमध्ये चौपटीने विकल्या जाणाऱ्या फेस मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतींवर आळा बसवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पालिकेने करण्यासारखी एवढी कामे असतानासुद्धा, व्हायरसला रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, त्यामुळे वसई-विरार पालिका एकप्रकारे लोकांचा जीव धोक्यात घालत आहे, असे भट म्हणाले. पालिका प्रशासन या बाबत उदासिन आहेच शिवाय वसईतील लोकप्रतिनीधी काहीच जनजागृती करताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वसईच्या जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही भट यांनी केला आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा कारभार असाच सुरू राहिला तर नक्कीच वसई-विरारमध्ये करोना व्हायरस (novel covid 19) पसरलेला दिसेल.