मुस्लिम आरक्षणाला विरोध; शिवसेनेची सेटिंग? - भाजपाचा आरोप

28 Feb 2020 19:25:29

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारने मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असून त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मुस्लिमांना आरक्षण दिल्यास त्याचा ओबीसी आणि मराठा आरक्षणावर परिणाम होणार असून या आरक्षणाला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेची आघाडीतील घटक पक्षांबरोबर काय काय सेटिंग झाली होती? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


devendra-fadnavis_1 
 
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूदच नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण लागू केलेलं आहे. असं असताना राज्य सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्याला आमचा विरोध आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना देण्यात आलेलं आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर आहे. एससी/एसटीच्या आरक्षणानंतर ओबीसींना आरक्षण दिलं जातं. मराठा समाजालाही आरक्षण आहे. आता मुस्लिमांना आरक्षण दिल्यास त्याचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो आणि मराठा आरक्षण अडचणीत येऊ शकतं. त्यामुळेच आमचा धर्माच्या आधारावर मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाला विरोध आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. 
 
Powered By Sangraha 9.0