शेतकरी - ग्राहक चळवळीचे ठाण्यात पुनश्च हरीओम..

25 Dec 2020 14:58:26
ठाणे येथील पाटलीपाडा भागात माझी आई शाळेच्या परिसरात संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजार पुन्हा सुरु केला जाणार आहे. रविवार २७ डिसेंबर रोजी बळीराजाचा भाजीपाला आणि फळांचे पूजन करुन अभिनव पद्धतीने बाजाराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती शेतकरी बाजाराचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी दिली.
 
sanjay 2587_1  
 
पणन मंडळ आणि संस्कार संस्थेतर्फे गेली चार वर्षे ठाण्यात विविध ठिकाणी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शेतकरी आठवडा बाजार आयोजित केले जात आहेत. मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेले नऊ महिने हे बाजार बंद ठेवण्यात आले होते. हा केवळ बाजार नसून शेतकरी आणि ग्राहक यांना थेट फायदा देणारी चळवळ आहे, असे आ.संजय केळकर यांनी सांगितले.
 
जुन्नर, नारायणगाव, नगर, नाशिक आदी ठिकाणाहून शेतकरी गट थेट या ठिकाणी जोडले गेले आहेत. 'कोविड'च्या काळात लॉकडाऊन असताना आम्ही संकुलांत आणि निरनिराळ्या वस्त्यांमध्ये जाऊन थेट हजारो नागरिकांपर्यंत भाजीपाला पोहोचवण्याची व्यवस्था उभी केली. यात असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महापालिकेशी चर्चा करुन पुढील महिन्यापासून पूर्वी ज्या ठिकाणी शेतकरी बाजार सुरु होते, तेथे पुन्हा सुरु करुन शेतकरी आणि ग्राहक चळवळीला बळकटी दिली जाणार असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0