कोंडी धनगर वाड्यातील ग्रामस्थांनी श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती....!

14 Dec 2020 23:01:11

शिक्षक राजेंद्र खैरेंच्या प्रयत्नातून गावकरी एकवटले

पाली/गोमाशी : १४ सुधागड तालुक्यातील कोंडी धनगर वाड्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेली कोंडजाई देवीचे मंदिर ही या ठिकाणीच आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजी झालेली नाही.
 
sudhagad_1  H x
 
अखेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र खैरे तसेच स्वदेस फाऊंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर दिपक मेनन यांनी ग्रामस्थांना एकजूट करून श्रमदानातून हा रस्ता सुकर केला आहे. ही मोहीम ३ दिवसांत पूर्ण झाली. शिक्षक राजेंद्र खैरे यांच्या आवाहनाला साद देत सर्व ग्रामस्थ एकत्र आहे. हाती फावडे, कुदळ घमेले आदी साहित्य घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी एकत्र आले. मोहीमेत महिला, लहानगे वृद्ध आदींचा पुढाकार होता. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली खडी व दगड व्यवस्थित पसरण्यात आले. रस्तावरील मोठे दगड हटविण्यात आले. आजूबाजूची झाडेझुडपे तोडण्यात आली. त्यांनतर पसरलेल्या दगडांवर बुरम व मातीचा भराव त्यावर टाकण्यात आला आणि रस्ता सुस्थितीत करण्यात आला.
 
सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडा म्हणजे उत्पनाचे कोणतेही साधन नसलेल्या आणि हातावर पोट असलेल्या गरिबांचे गाव. गावपर्यंत एसटी ची सुविधा नाही. येथून जवळपास चार साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते. मात्र नागशेत ते कोंडी धनगर वाड्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन रस्ता सोडाच पण जुन्या रस्त्याची साधी डागडुजी देखील झालेली नाही. त्यामुळे येथे मोठाले खड्डे पडले आहेत. दगड व माती वर आली आहे. येथून चालणे देखील दिव्य आहे. येथील वृद्ध, महिला, रुग्ण व विद्यार्थ्यांना या खडतर रस्त्यावरून ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते.
 
sudhagad2_1  H
 
विशेष म्हणजे हा रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. रस्त्याअभावी लोकांचे खूप हाल होत आहेत. राजकीय पुढारी, नेते तसेच शासन फक्त आश्वासनांशिवाय काही देत नसल्यासाचे ग्रामस्थ विशाल ढेबे यांनी सांगितले. तर मंगेश ढेबे यांनी सांगितले की शिक्षक राजेंद्र खैरे व स्वदेसचे दिपक मेमन यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांना श्रमदानासाठी एकत्र केले. या श्रमदान मोहिमेत शिक्षक राजेंद्र खैरे, ग्रामपंचायत सदस्य बाळू ढेबे, स्वदेस फाऊंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर दिपक मेनन, ग्रामस्थ प्रकाश ढेबे, रामचंद्र बावधाने, दगडू कोकरे, मंगेश ढेबे, सुनील हिलम, भाऊ बावधाने दगडू गोरे, व लक्ष्मण ढेबे, नामदेव ढेबे व पांडुरंग ढेबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0