जीवघेणी मानसिकता 'अंधश्रद्धेची '

अनंत बोरसे    25-Nov-2020
Total Views |
सगळीकडे दिवाळी सण साजरा होत असतांनाच पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली. शहापूर तालुक्यातील चांदा (खर्डी) गावातील नितिन मुकेश, महेंद्र हे तीन तरुण आमावस्येच्या रात्रीपासून बेपत्ता होते आणि २० तारखेला त्यांचे मृतदेह जंगलात झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळले.
 
2andhshradha_1  
याबाबत नितीन याला गेल्या अनेक वर्षापासून मंत्र-तंत्र विद्येचे आकर्षण होते आणि त्याच्या घरात देवी-देवतांच्या मुर्ती आणि पुजेचे साहित्य असुन हे तिघेही बऱ्याच वेळा धार्मिक कार्यक्रमांत एकत्र असायचे. याच पार्श्वभूमीवर तिघांच्या मृत्यू मागे अंधश्रद्धेतुन आत्महत्या असल्याची चर्चा होत आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा आपल्याला का ओळखता येत नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
 
आपण कितीही पुढारलेले, पुरोगामीत्वाचे, शिक्षणाचे, आधुनिकीकरणाचे दावे करीत असलो, त्याच बरोबर शाहु, फूले आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत असलो तरी आजही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील अंधुक सीमारेषा कोणीही ओळखु शकले नाही आणि त्याची परिणती आजही बुवाबाजी, जादुटोणा, काळी जादु याचा वापर करून निषापांचे बळी जाण्यात होत आहे. अंधश्रद्धा ही एक मोठीच सामाजिक समस्या राहिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर, डाँ. श्याम मानव यांच्या बरोबरच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा लढा दिला, जनजागृती केली आणि म्हणूनच महाराष्ट्रात बुवाबाजी, जादुटोणा विरोधी कायदा राज्यात डिसेंबर २०१३ मध्ये अस्तित्वात आला.
 
असा कायदा फक्त महाराष्ट्रातच बनला आहे डाॅ.नरेंद्र दाभोळकर यांना तर प्राणाची आहुती घ्यावी लागली होती, कहर म्हणजे त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी प्लॅनेट केल्याची चर्चा होती. मानवी मनातील भिती, भविष्याची चिंता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, दैवा बाबतचे अज्ञान, यामुळे शिक्षित असो वा अशिक्षित बहुतेक वेळा अनेकजण अंधश्रद्धेच्या नादी लागून आपले आयुष्य बरबाद करून घेतात. आपल्या देशात काहीही विकले जाते, याचा बुवाबाजी, तंत्र मंत्र करणारे गावोगावचे तथाकथित दैवी अवतार, बंगाली बाबा, देवीचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या माता हे गैरफायदा उठवित असतात.आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही.असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहेच मात्र ना कोणाला शिक्षेची भिती ना कायद्याचा धाक राहिलेला आहे.दुर्दैवाने कायदे कागदावरच राहतात हे वास्तव आहे.
 
अंधश्रद्धा ही केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरीभागात झाल्याचे अनेक प्रकार घडत आहेत.बऱ्याच वर्षापुर्वी राज्यातील नेत्यांपासून सामान्य जनतेने गणपतीला दुध पाजलेे होते. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील खोली नंबर ६०२ ही देखील काही महिन्यांपूर्वी अंधश्रद्धेने चर्चेत आली होती. दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे एखोलकाच कुटुंबातील अकरा लोकांनी गळफास लावून घेतल्याची घटना घडली होती. लहान मुलांचे नरबळी चे देखील अनेक प्रकार घडले आहेत.चांदा येथील तीन जणांच्या मृत्यूने पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा प्रश्न समोर आला आहे. घटनाक्रम आणि घटनास्थळी दिसलेले चित्र त्याच दिशेने अंगुलीनिर्देश करणारे आहे. या बाबत ज्या झाडावर तिघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले त्याच झाडावर गुलाबी रंगाच्या चौथा फास असल्याची चर्चा आहे मात्र याबाबत पोलिसांनी अजूनही कुठलीही शक्यता नाकारलेले नाही.
 
एकिकडे आपण चंद्रावर, मंगळावर पोहचत आहोत, विज्ञान पुढे गेल्याचा दावा करीत आहेत, नभांगणाला गवसणी घालत आहोत, पुरोगामीत्वाचा डंका पिटत आहोत, तर दुसरीकडे असे चित्र दिसणे हे नक्कीच सर्वांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. अंधश्रद्धा विरोधाची लढाई ही वरवर दिसते तेवढी नक्कीच सोपी नाही. सामाजिक पातळीवरील उदासिनता दुर करुन सामुदायिक प्रयत्न हे व्हायलाच हवे. लढाई खुप मोठी आहे,मात्र आपणा सगळ्यांना लढाई लढावीच लागेल.