शहापूर शहर डम्पिंग ग्राउंडविना वांझोटा; महामार्गांवर कचऱ्याचे ढीग

उमेश मारुती भेरे    11-Nov-2020
Total Views |
ज्या शहराला डम्पिंग ग्राउंड नाही तो शहर विकासाच्या द्रुष्टीने वांझोटाच असतो .चार ही बाजूने विविध सरकारी प्रोजेक्ट, सम्रुद्धी सारखे इतर काही महामार्गांचे जाळे, एज्युकेशन हब, रेल्वे, पर्यटन क्षेत्र, भव्य सदनिका, बाजारपेठा गावाकडून शहापूरात वाढलेली रेलचेल इतके अलंकार मढवलेला शहापूर शहर एकंदरीत " अर्बनायझेशन " च्या कक्षेत मोडण्याच्या तयारीत असताना अवतीभवती मात्र घाण, दुर्घंधी आणि धूराच्या लोटाने गुदमरतो आहे . शहापूर शहराच्या हद्दीत शहापूर नगरपंचायत, गोठेघर ग्रामपंचायत, वाफे ग्रामपंचायत, चेरपोली- बामणे ग्रामपंचायत, कळंभे- बोरशेती ग्रामपंचायत अस्तित्वात आहेत . स्वतः ला आतून विकासकामांत फणसाचे गरे समजणाऱ्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थां बाहेरून घाण आणि दुर्घंधीच्या काटेरी कवचाणे त्रस्त आहेत .
 
dumping-ground_1 &nb
 
तिन वर्षांपूवी शहापूर शहराच्या समस्या कशा सोडवता येतील याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पंचायत समितीच्या शेतकी भवनमध्ये तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा आयोजित केली होती .या सभेत डम्पिंग ग्राउंडच्या विषयावर ही साधक बाधक चर्चा करण्यात आली होती . या सभेत जिंदाल कंपनीचे दोन अधिकारी ही हजर होती .माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी कचरा व्यवस्थापन किंवा कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत विचारविनिमय केला .त्यासोबत कचरा व्यवस्थापनाबाबत जिंदाल कंपनी सकारात्मक असून कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी खातीवली गावाजवळ प्लांट उभारण्याबाबत प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता .या प्लांटला खातीवली येथील गावकऱ्यांचा विरोध होणार होताच पण याबाबत पर्यायी कोणतीही चर्चा, प्रस्ताव किंवा आणखी काही हालचाली पुढे झाल्या नाही .
 
कचरा व्यवस्थापन ही कोणत्याही लोकनेत्याची कल्पना असलीच पाहीजे .शहापूर शहराच्या सभोवती मुंबई- नाशिक महामार्गाच्या कडेला डम्पिंग ग्राउंड उभारले गेले , लोकानी डझनभर तक्रारी केल्या, पेटनाऱ्या कचऱ्याच्या धूरामुळे महामार्गावर अपघात घडत आहेत तरीही कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत चाललेत .त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहापूर नगरपंचायत किंवा बाजूच्या ग्रामपंचायती तांत्रिक अडचणी पुढे करून विषयाला कलाटणी देण्याचे काम करीत आहे .कळंभे- बोरशेती तसेच चेरपोली ग्रामपंचायत हद्दीत महामार्गालगत साचलेले कचऱ्याचे ढिगारे आजूबाजूच्या रहिवाशांच्या आरोग्याच्या द्रुष्टीने घातक ठरत आहेत .तर पेटवलेल्या कचऱ्याचे लोट महामार्गावर येत असल्याने महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांचा समतोल बिघडून प्राणघातक अपघात घडण्यास कारण ठरत आहेत .
 
मुंबई महानगर पालिकेसारख्या मोठ्या स्वराज्य संस्थेचे शेकडो एकर मध्ये डम्पिंग ग्राउंड आहेत .त्या ठिकाणी सुद्धा कचऱ्यात प्राणघातक वायू तयार होऊन आपोआप आग लागत असते .त्या मुळे पर्यावरणाची हानी होऊन आरोग्याला धोका पोहोचतो या कारणाने जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळी मुंबई महानगर पालिकेला नोटिस पाठवून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सूचना करीत असते .शहापूर सारख्या ठिकाणी बेकायदेशीर असलेले डम्पिंग ग्राउंड उगाच जळत असल्याने वातावरणाची हानी आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्यांसाठी एका अणू प्रमाणे आपण ही जबाबदार असून याची जबाबदारी घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी व संबंधित संस्थानी पुढे येणे गरजेचे आहे .फक्त ठेकेदारी आणि अर्थार्जनाची गणितं बांधून विकासाचा गाडा पुढे हाकणे आणि स्वतः ला विकास पुरुष, कार्यसम्राट किंवा विकासाचा वारा संबोधून घेणे कधीही गाढवपणाचेच...!
 
डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर शहापूर नगरपंचायत कडून प्रशासकीय अडचणीचे कारण पुढे करण्यात येत आहे .वनखात्याची जमीन डम्पिंग ग्राउंडसाठी मिळत नसल्याची ओरड नगरपंचायत कडून केली जात आहे .पण अशा तांत्रिक - प्रशासकीय अडचणी सोडवून आपल्याला नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीची सत्ता जनतेने बहाल केलेली असते .ज्या प्रमाणे एखादा ठेका मिळविण्यासाठी किंवा ऑनलाईन टेंडर " मेनेज" करण्यासाठी तडजोड केली जाते तेवढीच तडजोड अशा मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आणि तांत्रिक- प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी केली तर त्या ही सुटणे शक्य आहे .त्यासाठी विकासाची द्रुष्टी आणि सामाजिक भान असणे गरजेचे आहे . अन्यथा लोकप्रतिनिधी असेच बनतील-विस्कटतील, सत्ता येतील-जातील पण समस्या अशाच कचऱ्याच्या धुरांड्यात श्वास कोंडून राहतील .