सुनील केदार ग्वाल्हेरचा गड लढवणार

04 Oct 2020 13:31:36

- ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान

वर्धा : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या खांद्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
 
Sunil-Kedar_1  
 
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहणार आहेत. म्हणजेच नुकतेच भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार आव्हान देतील.
 
मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात येत्या काळात पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे ते सुपुत्र. सुनील केदार नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडाआणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
 
मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले विश्वासू सुनील केदार यांची निवड केली आहे. सुनील केदार यांनी नियुक्तीबद्दल कमलनाथ यांचे आभार व्यक्त केले. ग्वाल्हेर आणि मुरैना या काँग्रेसच्या मतदारसंघात ज्योतिरादित्य शिंदे यांच्याविरुद्ध सुनील केदार खिंड लढवतील.
Powered By Sangraha 9.0